कृषिपूरक व्यवसायात घडविला जागतिक विक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer success

कृषिपूरक व्यवसायात घडविला जागतिक विक्रम

शेतकरी कुटुंबातील तरुण नव-नवे प्रयोग करीत खडतर प्रयत्नांची मालिका गुंफतो. येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर शांत डोक्‍याने मात करतो. टप्प्या-टप्प्याने यशाची एक एक पायरी चढत राहतो. अपार परिश्रम आणि ध्येयनिष्ठेने प्रत्येक पायरीवर समाजासाठी प्रामाणिकपणे निश्‍चित काहीतरी करण्याचे भान ठेवतो. शेती आणि कृषिपूरक व्यवसायात यश मिळवत असतानाच ‘मातृभूमी पॅटर्न’ महाराष्ट्रापुढे ठेवतो. त्या तरुणाचे नाव आहे संतोष ठोंबरे! कोरोना संकटाचे सावट डोईवर घेऊन त्यांनी जिद्दीने शेतकरी बांधवांना नवा विश्वास देत ‘कुबोटा’ ट्रॅक्‍टर विक्रीत भारतात नव्हे तर जगात पहिला नंबर संपादन केला.

क्षेत्र कुठलंही असो, पैशांपेक्षा कष्टाचं भांडवल अधिक गुंतवलं तर तिथे यशाच्या शिखरावर पोहोचण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आणि मीही अगदी तेच केलं. शेतीत राबणं असो की उद्योगाला गती देणं, प्रामाणिक मेहनत व कौशल्याचं भांडवलं अधिक गुंतवत गेलो अन्‌ त्यात यश मिळत गेलं. हे सारं करताना सामाजिक कार्यातही कधी खंड पडू दिला नाही. या सगळ्याचं संचित म्हणून आजचे हे सोनेरी दिवस पाहू शकतोय, असे उद्‌गार बार्शीचे प्रसिद्ध उद्योजक संतोष (काका) ठोंबरे यांनी काढले. कुबोटा ट्रॅक्‍टरचे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याचे अधिकृत विक्रेते के.टी. ट्रॅक्‍टर्सचे सर्वेसर्वा, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, श्री भगवंत मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटीचे चेअरमन, बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, सहयोग स्थानिक रहिवासी मंडळाचे अध्यक्ष श्री. संतोष (काका) ठोंबरे हे ‘सकाळ’च्या महाब्रॅंड्‌स या विशेषांकाच्या निमित्ताने बोलत होते.

काळ्या मातीत उगवलेलं सोनं!

मूळचे बार्शी तालुक्‍यातील खामगाव येथील असलेल्या श्री. संतोष (काका) ठोंबरे यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर, माध्यमिक शिक्षण गावातील छत्रपती शिवाजी हायस्कुलमध्ये झाले. बार्शीतील शिवाजी महाविद्यालयातून बी.एस्सी. पूर्ण केली. खांडवी (ता.बार्शी) येथील शारीरिक शिक्षण महाविद्यालयातून बी.पी.एड.ची पदवी प्राप्त केली. कॉलेज लाईफमध्ये एनसीसीचे बी सर्टिफिकेट देखील मिळविले. शैक्षणिक पर्व संपल्यानंतर त्यांना पदव्युत्तर शिक्षण व एनसीसी बी ग्रेडच्या जोरावर प्रशासनात थेट नोकरीच्या संधी खुणावत होत्या. परंतु, ठोंबरे यांनी शेती आणि शेतीपूरक व्यवसायात करिअरचा निर्णय घेतला. वडिलोपार्जित शेती होती. सन 2000 मध्ये एक एकरभर द्राक्षांची बाग होती. ती संतोष काकांनी पाच एकरावर नेली. शेतात पाणी मुबलक असल्याने त्यांना बळ मिळाले. आणि शेतीत नवनवीन प्रयोग सुरु झाले. शालेय जीवनात सलग पाच वर्षे वर्गात मॉनिटर राहिलेल्या श्री. संतोष काकांना आपल्यातील नेतृत्वगुण स्वस्थ बसून देत नव्हता. त्यांनी गावातील शेतकरी बांधवांना सोबत घेऊन ‘कृषीराज फार्म’ नावाने शेतकरी मंडळ स्थापन केले. त्यावेळचे नाबार्डशी संलग्नित असणारे जिल्ह्यातील पहिले व एकमेव कृषी मंडळ होते. या मंडळामार्फत तरुण शेतकऱ्यांचे कृषी उत्पादन वाढविण्याबाबत विविध विषयांवर नियमित चर्चा घडत राहिली. ‘कृषीतीर्थ दौरा’च्या माध्यमातून राज्यात विविध भागात व इतर राज्यांमध्ये तरुण शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे घडविले. या कार्यास व्यापक बनविण्यासाठी खामगाव येथेच ‘कृषी भवन’ची उभारणी केली. निसर्ग आणि मार्केट हे शेतकऱ्यांच्या हातात नसतं. त्यामुळे कष्टाला कौशल्य आणि व्यापारपेठेतील अभ्यासाची जोड देणे गरजेचे असल्याचे त्यांनी जाणले होते आणि हे सर्व शेतकऱ्यांना पटवून देत कृषी उत्पादन वाढीसाठी नेहमीच प्रोत्साहीत केले.

चार एकराची नर्सरी

संतोष काकांनी खामगावातील फार्मवर सेंद्रीय पद्धतीने पिकवलेली तब्बल 50 प्रकारची फळे व पालेभाज्या उपलब्ध आहेत. 25 एकरावर सीताफळाची बाग, 13 एकर पेरूची बाग आहे. 4 एकर क्षेत्रावर ठोंबरे फार्म अँड नर्सरी ही सुपर गोल्डन सिताफळाची नर्सरी आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात रोपे सध्या उपलब्ध आहेत. त्यांचे बंधू श्री. राजेंद्र ठोंबरे हे नर्सरीची धुरा सांभाळत आहेत.

उद्योगातलं पहिलं पाऊलं

शेतीत राबतानाच कृषीपूरक उद्योगातही एन्ट्री करण्याची ओढ श्री. संतोष काकांना लागली होती. मग ठरलं, जेसीबी मशिन घ्यायची. त्यासाठी प्रयत्न सुरु झाले. खरं तर शेती विकसित करण्यासाठी बॅंकांचे 15 लाखाचे आणि खासगी 8 लाखाचे कर्ज डोक्‍यावर झाले होते. पण संतोष काकांना स्वत:च्या कर्तृत्वावर तितकाच भरोसा होता. मोठ्या धाडसाने सन 2007 मध्ये त्यांनी जेसीबी मशिन खरेदी केलं. आणि तेथून सुरू झाला त्यांचा उद्योग विश्वातला प्रवास. दिवसातले चोवीस तास मशिनचं कामं सुरू राहिलं पाहिजे यासाठी त्यांची धडपड सुरू राहिली. डिझेल आणण्यासाठी स्वत: कॅन घेऊन पंपावर हेलपाटे घालत राहिले. वेळप्रसंगी जेसीबीच्या केबीनमध्येच रात्री जागून काढल्या. पण मशिनचं काम दररोज चोवीस तास सुरूच ठेवलं. यामुळे ग्राहकांची कामे सातत्याने मिळत राहिली. डोक्‍यावरचं कर्ज फिटलं. मग आणखी एक जेसीबी मशिन भाडे तत्वावर चालविण्यासाठी घेतलं. तेथून त्यांनी मागे फिरून कधी पाहिलं नाही. बार्शीतील रिलायन्स गॅस पाईपलाईनच काम मिळालं. आर्थिकदृष्ट्या जम बसू लागला. अमरावती यथे नालाबंडींगच्या कामासाठी जेसीबी मशिन्स अविरत कार्यरत ठेवल्या. त्यासाठी दीड वर्षे अमरावतीत ते सहकुटुंब राहिले.

‘मातृभूमी’ची सामाजिक जाण

खामगाव आणि बार्शी येथील मातृभूमी प्रतिष्ठान या समाजिक संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष श्री. संतोष (काका) ठोंबरे यांनी समाजसेवेचे व्रत जपले. राज्यातील पहिलं जलस्वराज्य गाव ठरलेल्या मळेगावला जलयुक्त शिवार अंतर्गत जलसंधारणाच्या कामासाठी सलग पन्नास तास मोफत जेसीबी मशिन उपलब्ध करून दिले होते. यांसह पंधरा गावांत जलसंधारणाऱ्या कामासाठी मदत केली. "मातृभूमी'च्या माध्यमातून अन्नपूर्णा योजना कार्यान्वित केली. निराधार लोकांना मोफत जेवण देण्यात येऊ लागले. शहरातील हॉस्पिटलमधील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी फक्त 15 रुपयांत जेवणाचा डब्बा हा उपक्रम सुरू केला. चपाती- भाजी किंवा वरण- भात असे स्वरुप असलेल्या या डब्याचा लाभ दररोज 550 गरजू नागरिक घेत आहेत. अन्नपूर्णा योजनेसाठी महिनाकाठी 4 लाखाचा खर्च होतो. त्यासाठी लोकवर्गणीची मोठी मदत मिळत असल्याचे श्री.संतोष काकांनी सांगितले. बार्शीतील कॅन्सर हॉस्पिटल आणि तालुक्‍यातील 18 ग्रामपंचायतींना शुध्द पाण्यासाठी आरओ प्लॅंट बसवून दिले. त्या गावात लहान मुलांसाठी खेळणी बसवून दिली. त्या गावातील एक ते पाच वयोगटातील बालकांसाठी आरोग्य कार्ड देण्यात आली. त्यांना बालरोगतज्ज्ञांमार्फत मोफत सेवा मिळते. सात गावांमध्ये पिकअप शेड उभारले. मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये बार्शी परिसरात अडकलेले कामगार, गोरगरिब व गरजू अशा एक हजार 850 जणांना दररोज मोफत जेवण देण्यात आले. सध्या कोरोना संकटात ‘ऑक्‍सिजन सिलिंडर बॅंक’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. यासाठी 150 सिलिंडर खरेदी केले असून, ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर अवघ्या सातशे रुपये दराने हे ऑक्‍सिजन सिलिंडर रुग्णांना पोहोचविण्यात येत आहेत. यामुळे अनेक रुग्णांचे जीव वाचले आहेत. डिपॉझिट स्वीकारून रुग्णांच्या नातेवाइकांसाठी सतरंजी व चादर देण्याचा उपक्रमही सुरू आहे. नातवाईकांनी हे साहित्य वापस आणून दिल्यावर त्यांना डिपॉझिट परत केले जाते. नुकतेच, जगदाळे मामा हॉस्पिटलला दोन व्हेंटिलेटर भेट देण्यात आले. पोस्ट कोविड लोकांसाठी सात कॉन्सन्ट्रेटर मशिन उपलब्ध करून दिल्या आहेत. या सामाजिक कार्याची दखल घेत राज्य शासनातर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे दलित मित्र पुरस्काराने प्रतिष्ठानचा सन्मान करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध संस्था- संघटनांनी पुरस्कार देऊन प्रतिष्ठानचा गौरव केला आहे. विविध क्षेत्रातील 170 सभासद मातृभूमी प्रतिष्ठानशी जोडले गेले आहेत.

‘बालसंस्कार केंद्र’रूपी मायेचा आधार

बेघर, निराधारांच्या लहान मुलांसाठी बार्शी शहरात दोन ठिकाणी कुबोटा बालसंस्कार केंद्राची उभारणी संतोष काकांनी केली आहे. सोलापूर रोड आणि चारशे बावीस परिसर याठिकाणी ही केंद्रे कार्यान्वित आहेत. बालवाडी व अंगणवाडी शिक्षणाची सोय असलेल्या केंद्रांमध्ये दरवर्षी सत्तर मुले आपल्या शैक्षणिक जीवनाचा पहिला टप्पा हसत-खेळत पार करतात.

तालुकास्तरावर पहिली क्रिकेट असोसिएशन

बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा श्री. संतोष (काका) ठोंबरे यांच्याकडे आहे. ही असोसिएशन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अधिपत्याखालील सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनी संलग्नित आहे. तालुका स्तरावरील पहिली असोसिएशन म्हणून याची नोंद झाली आहे. याअंतर्गत बार्शीच्या शिवशक्ती मैदानावर नियमित 225 मुले व मुली क्रिकेटचा तंत्रशुध्द सराव करतात. त्यासाठी निष्णात कोचदेखील प्रशिक्षणासाठी उपलब्ध केले आहेत. असोसिएशनची साक्षी मिरगणे ही खेळाडू महाराष्ट्र संघाकडून खेळली. लवकरच तालुक्‍यातील कव्हे येथे पाच एकर क्षेत्रावर भव्य क्रिकेट ग्राऊंड साकारले जात आहे. भविष्यात दहा एकर क्षेत्रावर स्पोर्टस संकुल उभारण्याचा मानस असल्याचेही श्री. संतोष काकांनी सांगितले.

ट्रॅक्‍टर उद्योगात जगात भारी

कृषिपूरक कामांच्या निमित्ताने संतोष (काका) ठोंबरे यांचे विविध भागात दौरे व्हायचे. यावेळी त्यांच्या लक्षात आले की, आपल्या भागात छोट्या ट्रॅक्‍टरची एजन्सी नाही. तेव्हा त्यांनी या व्यवसायात उतरायचं ठरवलं. 2010 मध्ये कुबोटा ट्रॅक्‍टरची सोलापूर व उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांसाठीची ‘के. टी. ट्रॅक्‍टर्स' नावाने एजन्सी सुरू केली. बार्शीत त्यांचे मुख्य शोरूम असून, दोन्ही जिल्ह्यात मिळून 18 शोरूम आहेत. याठिकाणी 110 कर्मचारी कार्यरत आहेत. तत्पर सेवा, स्पेअर पार्टसची उपलब्धता यामुळे ग्राहकांना मोठे समाधान लाभले. सन 2019 मध्ये 650 ट्रॅक्‍टर तर, सन 2020 मध्ये तब्बल 1 हजार 5 ट्रॅक्‍टरची विक्री करून त्यांनी जगात विक्रम नोंदविला आहे. जगात अव्वल एजन्सी म्हणून केटी ट्रॅक्‍टर्सला बहुमान मिळाला. बार्शीमध्ये लातूर रोडवर के.टी. ट्रॅक्‍टर्सचे 40 हजार स्क्वेअर फुट जागेत अत्याधुनिक शोरूम उभारणी काम अंतिम टप्प्यात आहे. हे ग्रामीण भागातील पहिले अत्याधुनिक शोरूम असणार आहे.

टॅग्स :Farmer