#ThursdayMotivation : परदेशी तरुणाने घेतली गड-किल्ले चढण्याची शपथ

स्वप्नील मसुरकर
Thursday, 20 February 2020

शंभू गौरव पुरस्काराने सन्मानित
नुकतेच छत्रपती संभाजी महाराजांच्या ३४० व्या राज्याभिषेकाचे औचित्य साधत श्री शंभू राज्याभिषेक सोहळा समिती आणि शौर्यपीठ तुळापूर यांच्या वतीने पीटरला ‘शंभू गौरव पुरस्कार’ देण्यात आला. हा पुरस्कार घेताना पीटर म्हणाला, की आज मला या ठिकणी शंभू गौरव पुरस्कार दिल्याबादल मी श्री शंभू राज्याभिषेक सोहळा समिती, शौर्यपीठ तुळापूर यांचे मनापासून आभार मानतो. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये फिरत असताना मला प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते. एखाद्या भारतीय तरुणाला किंवा स्पोर्टस्‌ ट्रेकरला किल्ला चढण्यासाठी कमीत कमी चार ते पाच तास लागत असतील; मात्र पीटर हा अवघ्या एका तासात तो किल्ला सर करतो. ट्रेकिंगदरम्यानचे अनुभव तो वेगवेगळ्या शहरांत जाऊन वेगवेगळ्या लोकांना भेटून तो सांगत असतो.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले आणि ते राज्य रयतेचे राज्य होते. छत्रपती संभाजी महाराज यांनी याच स्वराज्यासाठी बलिदान दिले. मी भारतात आलो हे मी माझे भाग्य समजतो. आज मला दिलेला पुरस्कार हा मी सह्याद्रीत फिरणाऱ्या गडप्रेमींना अर्पित करत आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे, ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्याचे आवाहन करू इच्छितो.
- पीटर व्हॅन गेट

पीटर व्हॅन गेट - बेल्जियममधील नोकरी सोडून भारतातच मनसोक्त भ्रमंती
मुंबई - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भारतातच नाही, तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. महाराजांच्या विचाराने भारावून गेलेल्यांची संख्याही जगभरात आहे. असाच एक बेल्जियममधील तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडला आहे. पीटर व्हॅन गेट असे या तरुणाचे नाव असून तो युरोपियन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराने तो प्रेरित झाल्याने महाराजांचे गड-किल्ले चढण्याची जणू त्याने शपथच घेतली आहे. त्याने दोन महिन्यांत आतापर्यंत तब्बल २०० शिवकालीन किल्ले आणि लेणी सर केली आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पीटर हा बेल्जियममध्ये असलेल्या सिस्को कंपनीत संगणकतज्ज्ञ पदावर काम करतो. काही कामानिमित्त कंपनीने त्याला भारतात पाठवले होते; मात्र भारतात आल्यानंतर तो जणूकाही इथलाच होऊन गेला. 

बेल्जियममधून भारतात आल्यानंतर तो इथल्या निसर्गसौंदर्य आणि भारतातील सर्वसामान्यांचे जगणे बघून इतका भारावला, की बेल्जियममधील नोकरी सोडून भारतातच मनसोक्त भ्रमंती करू लागला आहे. भ्रमंतीदरम्यान त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रदेखील वाचले असून त्यातून तो अत्यंत प्रेरित झाला आहे.

#PuneMetro मेट्रोच्या कामात भूसंपादनाचा अडथळा

आयुष्यातील सर्व ओझी उतरवून या अवलियाने आकाश पांघरले आहे. सह्याद्रीच्या कडे-कपाऱ्यांना त्याने आपले घर बनवले आहे. सह्याद्रीच्या धरणांमध्ये, नद्यांमध्ये, तलावांचे पाणी पीत सह्याद्रीच्या कडे-कपाऱ्यांवर, बुरुजांवर, गडांवर राहणाऱ्या आदिवासींच्या घरांत जेवण केले आहे. 

विशेष म्हणजे त्याने कधी हॉटेल बुक केलेले नाही. पिझ्झा, बर्गरसारखे खाद्य सोडून महाराष्ट्रातल्या पिठलं-भाकरीच्या प्रेमातच जणू तो पडला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A foreign youth peter van geit oath to climb fortresses