याला म्हणतात माणुसकी! गावागावांत गुंठाभर जमिनीसाठी होतात वाद, इथं चव्हाण कुटुंबीयांनी आरोग्य केंद्रासाठी दिली जमिन 'दान'

भद्रेश भाटे
Tuesday, 6 April 2021

आमदार मकरंद पाटील यांनी कणूर येथे प्राथमिक उपकेंद्र मंजूर केले. मात्र, त्यासाठी प्रयत्न करूनही गावात जागा उपलब्ध होत नव्हती.

वाई (जि. सातारा) : कणूर (ता. वाई) येथील गंगाधर नाना चव्हाण यांनी स्वमालकीची चार गुंठे जागा उपलब्ध करून दिल्याने गावातील प्रलंबित प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे कणूर, नागेवाडी, दरेवाडी परिसरातील सुमारे तीन हजार ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे. गंगाधर चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दातृत्वाचे कौतुक होत आहे. 

आमदार मकरंद पाटील यांनी कणूर येथे प्राथमिक उपकेंद्र मंजूर केले. मात्र, त्यासाठी प्रयत्न करूनही गावात जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे उपकेंद्राचे काम गेली तीन-चार वर्षे प्रलंबित होते. याबाबत गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी गंगाधर चव्हाण यांच्याकडे जागेची मागणी केली. मुख्य रस्त्यावर असणारी मोक्‍याची जागा चव्हाण देतील का? असा प्रश्न सर्वांच्या मनात होता. पण, चव्हाण यांनी क्षणाचाही विलंब न लावता उपकेंद्रासाठी चार गुंठे जागा गावाला दिली. पत्नी लतिका, मुलगा चेतन यांनीही गंगाधर चव्हाण यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. 

बाळासाहेबांनी सर्वधर्मसमभाव जोपासत, कष्टकरी जनता, शेतकऱ्यांसाठी अखेरपर्यंत तडफेने काम केले : रामराजे 

आमदार पाटील यांनी या जागेतील तांत्रिक त्रुटी दूर केल्याने गावातील प्राथमिक उपकेंद्र होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चव्हाण यांचा सरपंच निखिल राजपुरे, उपसरपंच सुरेखा जाधव, हरिदास राजपुरे, हणमंत पवार, बाळू पाटील, सुनील राजपुरे, विलास राजपुरे, भानुदास राजपुरे, सुधाकर राजपुरे, प्रवीण मतकर, संदीप राजपुरे, हणमंत श्रीपती राजपुरे, सोसायटीचे अध्यक्ष गणेश राजपुरे, संदीप चव्हाण आदींनी ग्रामपंचायतीच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. या आरोग्य उपकेंद्राचा भागातील गरजू रुग्णांवर उपचार आणि त्यांच्या वेदना दूर करण्यासाठी उपयोग होणार आहे. आपल्या जागेचा वापर रुग्णसेवेसाठी होत आहे, यापेक्षा आणखी काय भाग्य असणार, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी व्यक्त केली. 

जिल्हा परिषदेत एजंटगिरी चालू देणार नाही; उदय कबुलेंचा इशारा

न्यायालयाने तोडगा काढा सुचविल्याने कऱ्हाड पोलिसांसह पालिकेची उडाली भंबेरी

कोरोना चाचणी केल्यासच कऱ्हाड पालिकेत प्रवेश; मुख्याधिकारी डाकेंचा सक्त आदेश

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gangadhar Chavan Family Donated Land For Health Center At Kanur Positive News