स्मशानभूमीत साकारला बगीचा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

पुसेगाव - वाढदिवसावर होणाऱ्या अनावश्‍यक खर्चाला फाटा देऊन येथील प्रताप जाधव मित्र समूहातर्फे स्मशानभूमी सुशोभीकरणाचा उपक्रम सुरू झाला. या उपक्रमाची प्रेरणा घेऊन पुढे आलेल्या पुसेगावातील अनेक दानशूर व्यक्तींनी सुशोभीकरणाच्या उपक्रमाला गती दिल्याने रुपडे पालटलेल्या या स्मशानभूमीला आता स्वच्छ, सुंदर व सुसज्ज अशा बागेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

अंत्यविधीसाठी स्मशानात जाणाऱ्या रस्त्याची झालेली दुरवस्था, रस्त्याच्या दुतर्फा पसरलेली घाण, पावसाळ्यात शोकाकूल नातेवाईकांना अंत्यविधीत येणाऱ्या अडचणी पाहून शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रताप जाधव यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्‍यक खर्च न करता पैशाचा विनियोग स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. प्रताप जाधव मित्र समूहाने या निर्णयाचे स्वागत केले अन्‌ स्मशानभूमी सुशोभीकरणाचा उपक्रम सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व पुसेगाव ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. जेसीबीच्या साह्याने रस्त्याचे रुंदीकरण व दुरुस्ती तसेच रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण झाले. स्मशानभूमीत बसण्यासाठी बाके, महिलांसाठी स्वतंत्र शेड, स्मशानभूमीच्या आतील बाजूस बाग, सावडणे विधीसाठी स्वतंत्र सोय, अंतर्गत काँक्रिटीकरण, घाटाची डागडुजी, आकर्षक प्रवेशद्वार, विजेची सोय व रंगरंगोटी आदी कामे झाल्याने स्मशानभूमीचे रुपडे पालटले. धर्मशाळा ते स्मशानभूमीपर्यंतच्या रस्ता डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दर महिन्याला येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी श्रमदानाद्वारे स्मशानभूमीची स्वच्छता करतात.

या स्मशानभूमीचे क्षेत्र वाढवून शेजारून वाहणाऱ्या येरळा नदीवर केटी बंधारा बांधण्यात येणार आहे. अंत्यविधीसाठी लोखंडी जाळी व रुग्णवाहिका, स्मशानभूमी ते चांभार चौक दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरणही केले जाणार आहे.
- प्रताप जाधव, जिल्हा उपप्रमुख, शिवसेना

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: garden in crematorium