दहिवडी : 'ती'च्या प्रामाणिकपणास पोलिसांचा सलाम

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 December 2019

दहिवडी बसस्थाकात सापडलेले गंठण गृहिणीने पोलिस मदत केंद्रात गृहरक्षक दलाचे अमित कुंभार, महेश खरात यांच्याकडे ते दिले. पोलिस शिपाई गणेश पवार यांनी याबाबतची माहिती दहिवडी पोलिस ठाण्यात दिली.
 

दहिवडी : येथील बस स्थानकात पुन्हा एकदा माणदेशी महिलेच्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय आला. त्यामुळे एका महिलेचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण काही तासांतच परत मिळाले.
 
येथील बस स्थानकात बुधवारी (ता.25) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास येथील अर्चना काशीद या आपल्या मुलाला आटपाडीला जाणाऱ्या बसमध्ये बसविण्यासाठी दहिवडी बस स्थानकात आल्या होत्या. बस येण्यासाठी वेळ असल्यामुळे त्या स्वच्छतागृहालगतच्या फलाटावर थांबल्या होत्या. बस स्थानकात मुक्कामी जाणाऱ्या, तसेच लांब पल्ल्याच्या बस पकडण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली होती.

साधारण पावणेसात वाजता अर्चना काशीद यांना तेथील खांबाच्या सावलीत अंधुकशा उजेडात कागदाच्या पुडीत काहीतरी चमकताना दिसले. त्यांनी ती पुडी उचलून पाहिली असता त्यात सोन्याचे गंठण असल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ ते गंठण बस स्थानकातील पोलिस मदत केंद्रात गृहरक्षक दलाचे अमित कुंभार, महेश खरात यांच्याकडे ते दिले. पोलिस शिपाई गणेश पवार यांनी ही माहिती दहिवडी पोलिस ठाण्यात दिली.

हेही वाचा - कोसळलेलं आयुष्य पेलताना..!
 
दरम्यानच्या तासाभरात वावरहिरे (ता. माण) येथील सुनंदा कापसे यांचा दहिवडी पोलिस ठाण्यात अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण गहाळ झाल्याबाबतचा फोन आला. पोलिस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण चौकशी केली असता अर्चना काशीद यांना सापडलेले सोन्याचे गंठण सुनंदा कापसे यांचेच असल्याचे खात्री पटली. सुनंदा कापसे या मुंबईला जाण्यासाठी दहिवडी बस स्थानकात आल्या होत्या. त्या वेळी त्यांच्याकडून गंठण ठेवलेली पुडी गहाळ झाली होती.
 
आज (गुरुवार) सकाळी अर्चना काशीद व सुनंदा कापसे यांना दहिवडी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. सोन्याचे गंठण परत मिळाल्याने सुनंदा कापसे यांना आनंदाश्रू अनावर झाले. त्यांनी अर्चना काशीद यांचे मनापासून आभार मानत त्यांना प्रेमाने साडी भेट दिली.

जरुर वाचा - चिमुरडी उभारतेय माणुसकीची भिंत

स्वतः लघुउद्योग चालवून घरखर्च भागविणाऱ्या अर्चना काशीद या गृहिणीच्या प्रामाणिकपणाला दहिवडी पोलिसांनीही सलाम केला. सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी अर्चना काशीद यांचा यथोचित सत्कार केला. या वेळी ठाणे अंमलदार नेहा कोळेकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक देवानंद तुपे, पोलिस हवालदार संजय केंगले, पोलिस नाईक नीता पळे, पोलिस नाईक यश्‍वदा मोरे, पोलिस शिपाई आशा काळेल, गोपनीयचे प्रकाश इंदलकर उपस्थित होते.
 

"सौभाग्याचं लेणं असलेलं गंठण महिलेसाठी किती मौल्यवान असते, त्याची जाणीव मला आहे. माझ्यामुळे त्या माउलीला तिचं गंठण परत मिळालं. यामुळे मी खूप समाधानी आहे.' 
- अर्चना काशीद, दहिवडी. 

हेही वाचा - चालून आलेली हज़ारोंची लक्ष्मी धनाजीने प्रामाणिकपणे परत केली

"गंठण हरवल्याने मी सैरभैर झाले होते. माझ्या आयुष्यात मला परत गंठण मिळेल, की नाही असे वाटत होते; पण अर्चना काशीद यांच्यामुळे माझे सोन्याचे गंठण परत मिळाले. मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहीन.' 
- सुनंदा कापसे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Gold Coin Found By Archana Kasheed Was Honestly Returned to Sunanda Kapse Satara Marathi News

Tags
टॉपिकस
Topic Tags: