हणबरवाडी एक कॅशलेस गाव!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

हणबरवाडी (ता. कागल) हे कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल पेमेंट प्रणालीद्वारे कॅशलेस व्यवहारांसाठी सज्ज झाले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमधील बदल स्वीकारण्यासाठी हणबरवाडीने उचललेले पाऊल कौतुकास्पद आणि अनुकरणीय असेच आहे. 

राज्य शासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत हणबरवाडी या छोट्याशा गावाने सकारात्मकदृष्ट्या बदल स्वीकारला आहे. ‘बॅंक ऑफ महाराष्ट्र’च्या सेनापती कापशी शाखेने पुढाकार घेऊन हे गाव कॅशलेस करण्याचा विडा उचलला आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी प्रत्येक बॅंकेने जिल्ह्यातील एक तरी गाव कॅशलेस करण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी आवाहन केले होते. त्याला जिल्ह्यातील ३२ बॅंकांनी प्रतिसाद दिला आहे. या सर्व बॅंकांनी जिल्ह्यातील एक एक गाव डिजिटल पेमेंट प्रणालीमध्ये आणण्यासाठी निवड केली. ‘बॅंक ऑफ महाराष्ट्र’ने हणबरवाडी हे गाव डिजिटल पेमेंट प्रणालीमध्ये आणले आहे. अवघ्या १५ दिवसांमध्ये हणबरवाडी कॅशलेस व्यवहारांसाठी सज्ज झाले आहे. एटीएम, क्रेडिट, डेबिट कार्डबाबत संपूर्ण माहिती गावकऱ्यांना देण्यात आलेली आहे. त्यासाठी आवश्‍यक खबरदारी कशा पद्धतीने घ्यावी याच्याही सूचना आणि प्रशिक्षण देण्यात आले आहे. आधार कार्ड क्रमांक बॅंक खात्याशी जोडणे, बॅंकेतून मिळणारे रुपे कार्ड व अन्य एटीएम डेबिट कार्डे तातडीने कार्यान्वित करणे, अशा सूचनाही बॅंकेने दिल्यामुळे ग्रामस्थांचा कॅशलेस होण्याचा मार्ग सोपा झाला आहे.

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती डिजिटल पेमेंट प्रणालीसाठी सज्ज केल्या जाणार आहेत. कॅशलेस पेमेंट किती सोयीचा आणि सोपा आहे, हे पटवून देण्यासाठी अग्रणी बॅंकेच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.

हणबरवाडीसारखे गाव पंधरा दिवसांत कॅशलेस झाले आहे. त्यामुळे इतर गावांतील तरुण, तरुणी, ज्येष्ठ नागरिक किंवा शेतकरी कॅशलेस होण्यास मदत होणार आहे. 
- शशिकांत किणिंगे, अग्रणी बॅंकेचे प्रबंधक

अशी राबवली मोहीम..
गावातील १४०६ लोकसंख्येच्या ३२० घरांमधील युवक, महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रामस्थांना प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. या गावात ८२३ बॅंक खाती आहेत. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या सेनापती कापशी शाखेने केलेल्या या सर्व प्रयत्नांना गावकऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि कोल्हापूर जिल्ह्यात डिजिटल पेमेंट व्हिलेज होण्याचा मान मिळविला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hanbarwadi cashless village