बेवारस सापडलेल्या मुली झाल्या न्यूझीलंडमध्ये शिक्षिका व इंजिनिअर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

पुणे - न्यूझीलंडच्या दाम्पत्याने एकोणीस वर्षांपूर्वी दत्तक घेतलेल्या दोन मुली पुण्यात आल्या असून, त्यांनी पोलिसांची भेट घेऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. 

पुणे - न्यूझीलंडच्या दाम्पत्याने एकोणीस वर्षांपूर्वी दत्तक घेतलेल्या दोन मुली पुण्यात आल्या असून, त्यांनी पोलिसांची भेट घेऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. 

आपल्याला ज्यांच्यामुळे आई-वडिलांचे प्रेम मिळू शकले, त्या पोलिसांना भेटण्याची इच्छा या मुलींनी व्यक्त केली, त्यासाठी त्या आपल्या कुटुंबीयांसह बालकल्याण समितीत आल्या. त्यांनी तेथून संबंधित माहिती घेऊन, डेक्कन पोलिस ठाणे गाठले. सहायक पोलिस आयुक्त बाजीराव मोहिते व वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांना या मुली आपल्या कुटुंबीयांसह भेटल्या. ‘पुणे पोलिसांनी त्याकाळी केलेल्या मदतीमुळे आमचे आयुष्य सुंदर बनले आहे,’ अशा भावना व्यक्त करत त्यांनी पोलिसांचे आभार मानले. 

तीनवर्षीय सीमा आणि दोनवर्षीय रीमा या दोन मुली एप्रिल १९९८ मध्ये पुणे पोलिसांना बेवारस अवस्थेत आढळून आल्या. तेव्हाचे डेक्कन पोलिस ठाण्यातील ए. के. कांबळे यांनी बालकल्याण मंडळाच्या आदेशानुसार ससून हॉस्पिटलच्या आवारातील सोफोश, श्रीवत्स संस्था यांच्याकडे मुलींची जबाबदारी सुपूर्द केली. संस्थेने पोलिसांच्या मदतीने मुलींच्या नातेवाइकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यात यश न आल्याने बालकल्याण समितीने या मुलींना दत्तकसाठी घोषित केले. मात्र, भारतातून या मुलींना कोणीही दत्तक घेण्यासाठी पुढे आले नाही.

एक शिक्षिका... एक इंजिनिअर...
न्यूझीलंडच्या एका दांपत्याने या मुलींना दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. १९९९ मध्ये सर्व सोपस्कार पूर्ण होऊन, त्या दोघी न्यूझीलंडला रवाना झाल्या. चोवीस वर्षीय सीमा झीनत हिने भरतनाट्यमचे शिक्षण घेतले असून, ती न्यूझीलंडमध्ये शिक्षिका आहे, तर तेवीस वर्षीय रीमा साजिया न्यूझीलंडमध्ये इंजिनिअर आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helpless Girls Newzeland Teacher Engineer Success Motivation