Video : हिमालयात स्वच्छतेचा ‘थ्री इडियट्‌स’चा ध्यास

(डावीकडून) खेनरब फुन्तसोग, स्माला तसिंग आणि ताशी तसिंग.
(डावीकडून) खेनरब फुन्तसोग, स्माला तसिंग आणि ताशी तसिंग.

पुणे - हिमालयाच्या हिमशिखरांवर लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा अभिनव प्रयोग लडाखमधील ‘थ्री इडियट्‌स’ करीत आहेत. एक-दोन नाही, तर चौदा वर्षे त्यांनी हा प्रयोग सातत्याने सुरू ठेवला आहे. हिमालय स्वच्छ ठेवण्याच्या, तेथील पर्यावरण संवर्धनाच्या आणि वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित ठेवण्याच्या धडपडीतून या प्रयोगाची सुरुवात झाली. या यशस्वी प्रयोगाची पुनरावृत्ती देशाच्या वेगवेगळ्या भागांबरोबरच मध्य आशियाई देशांमध्ये आता होऊ लागली आहे.

दक्षिण ध्रुवानंतर पृथ्वीवरील सर्वांत थंड प्रदेश अशी ओळख असणारा भाग म्हणजे लडाख. ‘थ्री इडियट्‌स’ चित्रपटातील ‘रॅंचो’ याच भागातला आणि पर्यावरण संवर्धनाचे अभिनव प्रयोग करणारे हे ‘थ्री इडियट्‌स’ याच शीत वाळवंटातले. खेनरब फुन्तसोग, ताशी तसिंग आणि स्माला तसिंग अशी या तिघांची नावे. लडाखच्या पूर्वेकडील भागात हेमिस राष्ट्रीय उद्यान वसले आहे. समुद्रसपाटीपासून १७ हजार फुटांवर असलेले चार हजार ४०० चौरस किलोमीटरवर पसरलेले हे राष्ट्रीय उद्यान हेच या ‘थ्री इडियट्‌स’चे कार्यक्षेत्र.

अत्यंत दुर्गम भागात हिमालयाच्या कुशीत वसलेल्या २२ गावांचा सर्वंकष विकास लोकसहभागातून होऊ शकतो. त्यातून पर्यावरण संवर्धन होतेच; पण पर्यटन आणि गिर्यारोहणालाही चालना मिळते. हिम बिबट्यांचा अधिवास सुरक्षित ठेवता येतो. इतके सगळे करूनही सर्वांत तरुण पर्वतरांगा असलेला हिमालय प्लॅस्टिक कचऱ्यापासून मुक्त ठेवता येतो, याचा वस्तुपाठ या तिघांनी घालून दिला.

‘हेमिस’ची पर्यटकांना भुरळ; पण...
हेमिस राष्ट्रीय उद्यान हे गिर्यारोहकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. हिवाळ्यात हिम बिबट्यांचा मोठा वावर या उद्यानात असतो. तसेच, वन पर्यटनासाठी गर्दी असते. देशाच्या वेगवेगळ्या भागांतून पर्यटक येथे येतात. पण, त्याचा कोणताच फायदा येथील नागरिकांना होत नव्हता. त्यांचे जीवनमान उंचावत नव्हते. 

स्थिती कशी सुधारली?
येथे येणाऱ्या पर्यटकांना प्लॅस्टिकच्या पिशवीलाही बंदी आहे. त्यामुळे प्लॅस्टिकची बाटली तर दूरची गोष्ट. शीतपेयाऐवजी लिंबू-पाणी, सोडा-पाण्याची सुविधा उपलब्ध केली. परदेशी खाद्यपदार्थांना पर्याय म्हणून स्थानिक पदार्थांना प्राधान्य देण्याचे आवाहन पर्यटकांना केले. त्याला पर्यटकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे हिमालयात जमा होणारा प्लॅस्टिक कचरा वेगाने कमी झाला. तेथील पर्यावरण संवर्धनासाठी आणि पर्यायाने तेथील वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित झाला. हा सगळा प्रकल्प लोकसभागातून उभारला. पर्यटकांशी संवाद साधण्याचे प्रशिक्षण त्यांनी दिले.

पर्यावरण जोपासणाऱ्या या प्रकल्पाची पुनरावृत्ती देशाच्या वेगवेगळ्या भागांबरोबरच किर्गिजस्तानातही आता होत आहे. तेथे जाऊन आम्ही या प्रकल्पाची सविस्तर माहिती तेथील सरकारला दिली आहे. लोकसहभाग हा या प्रकल्पाचा आत्मा असल्याचेही त्यांना सांगितले.
- खेनरब फुन्तसोग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com