हिंगोली जिल्ह्यात घडला यशस्वी प्रक्रिया उद्योजक

हिंगोली जिल्ह्यात घडला यशस्वी प्रक्रिया उद्योजक

हिंगोली जिल्ह्यातील बोरी सावंत येथील उच्चशिक्षित भगवान सावंत यांनी आपल्या परिसरातील संधी शोधली. त्यातून दुग्धप्रक्रिया व्यवसाय आकारास आणला. प्रक्रिया उद्योजक म्हणून अोळख तयार केली.  दूध, पनीर, खवा या मुख्य पदार्थांच्या निर्मितीबरोबर अन्य पदार्थांना मार्केट मिळवून दिले. भागातील चारशेहून अधिक दूध उत्पादकांनाही त्या माध्यमातून दूधविक्रीसाठी हक्काचे मार्केट मिळाले. 

बोरी सावंत (ता. वसमत, जि. हिंगोली) येथील भगवान सावंत यांची सहा एकर वडिलोपार्जित शेती आहे. कोरडवाहू जमीन असल्याने सक्षम उत्पन्नाची खात्री नव्हती. या परिस्थितीत सावंत यांची डाॅक्टर होण्याची इच्छा होती; परंतु ‘मेडिकल’चा प्रवेश हुकल्याने त्यांना बी.एस्सी.ला प्रवेश घ्यावा लागला. त्यांनी एम. एस्सी.(रसायनशास्त्र) पदवीही संपादन केली. 

करिअरमधील टप्पे

नोकरीच्या सुरवातीच्या काळात काही काळ साखर कारखान्यामध्ये पर्यवेक्षक म्हणून काम केले. सन २००२ मध्ये सावंत गंगाखेड येथील कृषी विद्यालयाचे प्राचार्य झाले. त्यांच्या पुढाकारातून कडकनाथ कोंबडी, श्वान, शेळी फार्म, रोपवाटिका, गांडूळ खतनिर्मिती असे विविध शेतीपूरक उपक्रम सुरू झाले.

सन २०१२ मध्ये गंगाखेड येथे भागीदारीतून दूध डेअरी उद्योग सुरू केला. तेथे दररोज ५ हजार लिटर दुधाचे पॅकिंग व विक्री व्हायची. त्याचवेळी गावात राजे छत्रपती दूधउत्पादक व पुरवठा सहकारी संस्थेच्या माध्यमातून दूध संकलन सुरू केले. पुतण्या राजू सावंत आणि भाचा अंगद चव्हाण यांच्यावर व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली. तेथून गंगाखेड येथील डेअरीला दूध पुरवठा केला जात असे. परंतु, वाहतूक खर्च परवडत नसल्यामुळे परभणी येथील शासकीय दूध डेअरीला पुरवठा सुरू केला. दरम्यान, वसमत तालुक्यातील ‘एनडीडीबी’ संस्थेचे दूध संकलन केंद्र बंद झाले होते. तेथील दूध उत्पादकांना सावंत यांच्या डेअरीचा पर्याय मिळाला. परंतु, शासकीय डेअरीकडून रास्त भाव मिळत नव्हता. त्यामुळे डेअरी उद्योगातील अनुभवाच्या जोरावर सावंत यांनी स्वतःचा दूधप्रक्रिया उद्योग सुरू करीत

२०१३ मध्ये प्रभावती डेअरी फार्मची नोंदणी केली. जवळा बाजार (जि. हिंगोली) येथे पॅकिंग युनिट सुरू केले. दोन वर्षांच्या दुष्काळामुळे दूध उत्पादन घटले. त्यामुळे पॅकिंग युनिट पुणे जिल्ह्यात स्थलांतरित करावे लागले. तेथे दूध प्रक्रिया पॅकिंग युनिट आहे. सावंत यांचा भाचा तसेच मित्र संतोष सातकर तेथील व्यवस्थापन पाहतात. येथून मुंबईला सुमारे दोन हजार तर पुण्याला सुमारे तीन हजार लिटर दूध जाते. 

नफ्याचे शास्त्र 

या उद्योगातून साधारणतः खर्च जाता १५ ते २० टक्के नफा मिळतो. सावंत यांनी शैक्षणिक नोकरी सोडून दिली. परंतु आता त्याहून सक्षम उत्पन्न ते मिळवित आहे. दूध विक्रीच्या तुलनेत प्रक्रिया पदार्थांपासून अधिक नफा मिळतो. आगामी काळात दूध पॅकिंग युनिट, चिज निर्मिती सुरू करण्याचा मानस असल्याचे सावंत यांनी सांगितले.

वैशिष्ट्ये 
 प्रत्येक दूध उत्पादकास कोड क्रमांक दिला आहे. दुधाची प्रत, संकलन, दर, त्यानुसार येणारी रक्कम आदी नोंदी ठेवल्या जातात. दूध उत्पादकांना दर रविवारी आठवडी बाजारादिवशी रोखीने पेमेंट केले जाते. रक्कम मोठी असेल तर चेकही दिला जातो. यंत्राद्वारे बिल दिले जाते.  
अकोट, परतूर, बीड, निलंगा, जळगाव येथील दूध प्रकिया उद्योजकांना सावंत मार्गदर्शन करतात. 
उद्योगासाठी बॅंकेचे कर्ज अथवा कोणत्याही योजनेचे अनुदान घेतलेले नाही. महाराष्ट्र फार्मर्स फांउडेशनतर्फे दीड लाख व स्वतःचे एक लाख रुपये अशी अडीच लाख रुपयांची गुतंवणूक करून उद्योगाची सुरवात केली.
सावंत यांनी १० एकर शेतजमीन खरेदी केली आहे. त्यांच्या १२ म्हशी असून दररोज शंभर लिटरपर्यंत दूध मिळते.

अॅग्रोवन प्रेरणादायी 

सावंत आपल्या उद्योगातील वाटचालीत अॅग्रोवनचा मोठा वाटा असल्याचे नमूद करतात. त्यातील यशोगाथा त्यांना प्रेरणादायी वाटतात. यशकथांचे त्यांनी संकलन केले आहे. 

प्रशिक्षण कौशल्य 

व्यवसायातील कौशल्य व गुणवत्ता आत्मसात करण्यासाठी त्यांनी सकाळ माध्यम समूहांतर्गत संस्थेतील लागवड व दुग्ध व्यवसाय प्रक्रिया अशी दोन प्रशिक्षणे घेतली आहेत. शिवाय रसायनशास्त्रातील उच्च पदवीधर व स्वअध्ययनाचाही फायदा उद्योगात झाल्याचे सावंत यांनी सांगितले.


 सावंत यांचा आजचा उद्योग 
 सन २०१५ मध्ये सावंत नोकरी सोडून पूर्णवेळ उद्योगात उतरले. सध्या जवळा बाजार येथे भाडेतत्त्वावरील जागेत प्रभावती डेअरी फार्म- तेथे दोनवेळा दूध संकलन, येथे दूध तपासणी यंत्र, एकहजार लिटर क्षमतेचे बल्क कूलर, २ डीप फ्रीजर, खवानिर्मिती यंत्र, क्रीम सेपरेटर, वाहतूक क्रेट आदी यंत्रसामग्री.  अौंढा नागनाथ आणि वसमत येथेही संकलन केंद्रे सुरू केली आहेत. 

 विक्री उत्पादने व फोकस 
 दूध - दररोज ४०० लिटर विक्री. दर - ५० रुपये प्रति लिटर. 
 दही - २०० लिटर दुधापासून निर्मिती 
 पनीर - (म्हशीच्या दुधापासून) दररोज ७० ते १०० किलो 
 खवा - (गायीच्या दुधापासून) दररोज ६० ते १०० किलो 

 अन्य उत्पादने
 दररोज १० किलो तूप तर दह्यापासून चक्का व श्रीखंड, आम्रखंड, ताक, लस्सी ही उत्पादने तयार केली जातात. धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभातील मागणीनुसार बासुंदी. 
 शिल्लक दूध मालेगांव (जि. नांदेड) येथे पाठवले जाते.
 दर - (घाऊक आणि कंसात किरकोळ विक्रीचे प्रतिकिलो)
    तूप ४३० रुपये (४५० रुपये), दही ४० रुपये (५० रुपये), 
    पनीर २०० रुपये (२४० रुपये)
 ग्राहक - मुख्यतः नांदेड शहरातील हाॅटेल व्यावसायिक व अन्य   
 सध्या उद्योगाची वार्षिक उलाढाल सुमारे एक कोटी रुपये. 
 सुरवातीला तीन कर्मचारी होते. आता १२ जणांना रोजगार मिळाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com