...जेव्हा माणुसकी ठरते पैशांपेक्षाही श्रेष्ठ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

सध्या दररोज सर्वसामान्यांपासून उच्चभ्रूंपर्यंत अनेकांची विविध कारणाने लुबाडणूक झाल्याची उदाहरणे समोर येतात. असे असताना या शेतकऱ्याकडून २८ हजार रुपये परत करण्याची घटना पैशांपेक्षा माणुसकी कुठेतरी शिल्लक असल्याचे दाखवून गेली.

पुणे -  रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षामध्ये (आयसीयू) मुलावर उपचार सुरू होते. शेतीत काबाडकष्ट करणारे त्याचे वडील रुग्णालयात मुलगा केव्हा बरा होईल, हा विचार करीत बसले होते. तेवढ्यात त्यांना त्यांच्या खुर्चीजवळच भरपूर नोटा पडलेल्या दिसल्या. क्षणभरही मन विचलित होऊ न देता त्यांनी रुग्णालय प्रशासनाला ही माहिती दिली. सीसीटीव्हीची पाहणी केल्यानंतर व्यक्तीची ओळख पटली आणि दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्याने त्या व्यक्तीला २८ हजार रुपये दिले.

सध्या दररोज सर्वसामान्यांपासून उच्चभ्रूंपर्यंत अनेकांची विविध कारणाने लुबाडणूक झाल्याची उदाहरणे समोर येतात. असे असताना या शेतकऱ्याकडून २८ हजार रुपये परत करण्याची घटना पैशांपेक्षा माणुसकी कुठेतरी शिल्लक असल्याचे दाखवून गेली. भीमराव धनाजी राठोड हा दौंडमधील सोनवडीतील एक सर्वसामान्य शेतकरी. राठोड यांच्या मुलाच्या कंपनीत झालेल्या स्फोटात मुलगा भाजला. त्यांनी त्याला पुण्यातील सूर्यसह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तो ‘आयसीयू’मध्ये आहे. शुक्रवारी सायंकाळी राठोड रुग्णालयाच्या प्रतीक्षालयामध्ये बसले होते. त्या वेळी त्यांना खुर्चीजवळच नोटा दिसल्या. त्यांनी चौकशी कक्षातील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. मात्र त्यांच्याकडेही याबाबत कोणीही तक्रार केलेली नव्हती. त्यामुळे त्यांनी राठोड यांना पैसे त्यांच्याकडे ठेवण्यास सांगून कोणी विचारल्यास सांगू, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी चंद्रकांत विष्णू राऊत राठोड यांच्याकडे आले, त्यांनी आपले पैसे हरविल्याचे सांगितले. त्यानंतर राठोड यांनी कर्मचाऱ्यांना सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यास सांगितले, त्यानंतर त्यांच्याकडे पैसे सुपूर्त केले. 

संकटाच्या काळात ते पैसे तुम्हाला ठेवावे वाटले नाहीत का? या प्रश्‍नावर राठोड म्हणाले, ‘‘मुलाचा खर्च त्याची कंपनी करतेय. मग मी एखाद्याच्या कष्टाचे पैसे घेऊन काय करणार.’’ त्यांच्या या निर्मळ उत्तराने माणुसकीचे दर्शन घडविले.

मोबाईल केला परत
दुसरी एक घटना अशीच घडली. मुंबईहून पुण्याला बसने आलेल्या डॉ. सुलक्षणा बनसोडे या कोथरूडला घरी जाण्यासाठी कॅबमध्ये बसल्या. त्या वेळी मोबाईल बसमध्येच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. मोबाईलपेक्षा त्यामधील फोन नंबर, गोपनीय माहिती यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी गेल्यामुळे त्या हळहळल्या. तेवढ्यात त्यांच्या जावेच्या मोबाईलवर त्यांच्याच मोबाईलवरून ज्ञानेश्‍वर देवकर बोलले. त्यांनी त्यांचा हरविलेला मोबाईल परत केला, त्या वेळी डॉ. बनसोडे यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: humanity is better than money