तांड्यावरील तरुणाची अशीही ‘कलासाधना’

तांड्यावरील तरुणाची अशीही ‘कलासाधना’

मराठी, बंजारा भाषेतील गीतांची रचना; चांगल्या संधीची प्रतीक्षा
जळगाव - प्रतिकूल स्थितीमुळे लपून राहिलेल्या कलेची साधना केली तर ती केव्हातरी समोर येतेच. आणि त्यातून एखादा उदयोन्मुख कलावंत उदयास येतो, असा सार्वत्रिक अनुभव आहे. पाचशे वस्तीवरच्या तांड्यात जन्मलेल्या बंजारा समाजातील एका तरुणाच्या गीतांची रचना व संगीतबद्ध करण्याचा छंद त्याच्यातील भन्नाट कलाविष्काराची प्रचिती देतो. बेताच्या आर्थिक स्थितीने त्याच्या कलाप्रवासाला ‘ब्रेक’ लावलेला असला, तरी तो चांगल्या संधीच्या शोधात दिवसरात्र मेहनत घेत आहे. 

रावेर तालुक्‍यातील निसर्गाच्या सान्निध्यात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले आथोडतांडा या पाचशे वस्तीच्या गावातून उदयास येणारा कुणाल रमेश पवार हा गायक कलाकार. सध्या जळगाव येथील पी. ई. तात्या फार्मसी या महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिक्षण घेत आहे.

लहानपणापासूनच गायनाची कला जोपासत स्वतःच गाणी लिहून त्याची चाल बसवून ही गाणी तो संगीतबद्ध करतो. आतापर्यंत त्याने पंधरा गाणी तयार करून सात गाण्यांचे रेकॉर्डिंग केले आहे. त्यात मराठी, बंजारा भाषेतील गाण्यांचा समावेश आहे. घरची परिस्थिती तशी बेताचीच असल्याने गाणी रेकॉर्डिंग करण्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी मित्रांच्या मदतीबरोबर आर्थिक मदत करणाऱ्यांचाही तो शोध घेत आहे. चित्रपट सृष्टीत गायक कलाकार होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याची कलेची साधना अविरत सुरूच आहे.

आजोबांमुळे लागला गायनाचा छंद
बेताच्या आर्थिक परिस्थितीत कुणालला त्याचे आजोबा भजन करताना सोबत न्यायचे, त्यातून त्याला गायनाचा छंद लागला. यातूनच पाचवीमध्ये असताना शाळेत गीत गायन स्पर्धेत गाण्याची पहिली संधी मिळून त्याने स्वत: गाणे लिहून, तालबद्ध करून गाणी आपल्या सुमधुर आवाजातून विविध ठिकाणी कार्यक्रमांमध्ये गावून आपली कला सादर करत आहे.

बंजारा समाजाने मुंबईला केला सत्कार
‘सेवा भाया... देगो तू नारो नाम’ आणि ‘सांभाळ जनिए वात मान जानिए म कसो केऊ छोटी तोनं’ ही दोन गाणी बंजारा भाषेत तयार केली आहेत. त्यांची दखल घेत भारतीय बंजारा समाज कर्मचारी व सेवा संस्थेने कुणालचा मुंबईतील मोठ्या सोहळ्यात सत्कार केला. जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्यावर कुणालने ‘दमदार वेलकम’ हे गीत लिहून ते संगीतबद्ध  केले आहे. पण त्याचे रेकॉर्डिंग अद्याप होऊ शकलेले नाही. 

संधीच्या प्रतीक्षेत कुणाल

कुणालने आतापर्यंत १५ गाणी लिहून संगीतबद्ध केली आहेत. आता त्याला लघु चित्रपटासाठी गाणी तयार करण्याची संधी मिळणार आहे. त्यातच बंजारा गाण्यांचे व्हिडिओ अल्बम तयार करण्यासाठी बंजारा समाजातील संस्थेने सहकार्य दर्शविले आहे. त्यातच कुणालने ‘स्त्री भ्रूण हत्या, शहीद जवान, शेतकरी आत्महत्या आदी सामाजिक प्रश्‍नांवर गाणी तयार करण्याचे ठरविले आहे. चांगल्या संगीत कंपनीच्या संधीची त्याला प्रतीक्षा आहे.

आकाशवाणीवर मुलाखत
कुणालला संगीताची लहानपणापासून आवड. मात्र, घरची परिस्थिती बेताची व दुर्गम भागातील तांडा. यामुळे कुठेही संगीताची शिकवणी अथवा कोणाकडे गायनाचे धडे मिळाले नाही. मात्र जिद्द, मेहनतीच्या जोरावर गायनाचा सराव करून कमी वयात त्याने एक चांगला उदयोन्मुख गायक म्हणून ओळख निर्माण केली आहे. याची दखल जळगाव आकाशवाणी केंद्राने त्याची मुलाखत घेऊन ती प्रसारित केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com