पत्नीने दिला आयुष्याला आकार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

कोल्हापूर - ""उषा जर माझ्या आयुष्यात आली नसती, तर माझ्या आयुष्याला आकार मिळाला नसता. आज जे काही आहे, त्यात तिच्या मार्गदर्शनाचा वाटा मोठा आहे. आमचा भाड्याच्या घरातून सुरू झालेला संसार स्वत:च्या छोट्या बंगल्यात सुखाच्या क्षणांनी आज व्यापला आहे. दवाखान्यात काम करणारी, प्रसंगी चहा-नाष्टा बनवून देणारी उषा माझ्या आयुष्यात लाखमोलाची आहे. तिचे माझ्याबरोबरचे संघर्षाचे क्षण मला सांगणेच कठीण आहे,'' जरगनगरातील जयसिंगराव सुतार सांगत होते आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या पत्नीचे गुणगान गात होते. 

श्री. सुतार हे रंकाळा टॉवर येथे राहणारे. त्यांचा व्यवसाय सुतारकामाचा. ते शिवाजी मराठा हायस्कूलमधून नववीपर्यंत शिकले. घराशेजारीच उषा पत्की यांचे घर. त्यामुळे दोघांची मने आपोआप एकमेकांत गुंतली. घरच्या मंडळींचा "इंटरकास्ट मॅरेज'ला विरोध असतानाही दोघांचा लग्नाचा विचार पक्का झाला. त्यांनी पांडुरंग काटकर या मित्राच्या मदतीने 1973 ला नृसिंहवाडीला प्रेम विवाह केला. मात्र, त्यांना घर कायमचे सुटले. दोन्हीकडील कुटुंबांनी त्यांच्याशी अबोला धरला. त्यांनी एक वर्षे पुण्यात हडपसर येथे भाड्याच्या घरात संसार थाटला. तेथे आठवड्यातून एक-दोन दिवस उपाशी राहण्याची वेळही आली. मात्र, पत्नीने दिलेला आधार आणि त्यांची चिकाटी बळकट करणारा ठरला. एक वर्षांनी पुन्हा कोल्हापुरात परतल्यानंतर ते बाबूजमाल परिसरात भाड्याच्या घरात राहिले. महिन्याकाठी दहा ते वीस रुपयांची कमाई करून नव्या जोमाने संसार सुरू केला. याच दरम्यान जरगनगरमध्ये जागा घेऊन तेथे तट्टयाच्या घरात राहू लागले. जागेचे पैसे एकदम देणे अवघड होते. थोडे-थोडे पैसे देऊन जागा अखेर खरेदी केली. 

पत्नीच्या कष्टाबाबत श्री. सुतार म्हणाले, ""उषाने डॉ. प्रकाश गांधी यांच्या दवाखान्यात नर्स म्हणून बारा वर्षे काम केले. जरगनगरमध्ये त्या वेळी अनेक घरांचे बांधकाम सुरू होते. तेथील गवंड्यांसाठी चहा-नाष्टा बनवून देण्याचे कामही केले. मुलगा राजेश व राहुल यांना चांगले संस्कारही दिले. आम्ही 1998 ला घराचा मागील भाग बांधून घेतला, तर दोन वर्षांपूर्वी पुढच्या भागाचे बांधकाम केले. तिच्यामुळे जम्मू-काश्‍मीर, आग्रा, दिल्ली, मथुरा, काशी अशी पर्यटन स्थळे फिरण्याचा अनुभवही घेतला आहे. आमच्या छोट्याशा बंगल्यात आता सौख्य नांदत आहे.'' 

नवख्या ठिकाणी विश्‍वासाने वावर 
श्री. सुतार म्हणाले, ""माझी जसलोक हॉस्पिटलमध्ये बायपास सर्जरी झाली. दोन-अडीच महिने मुंबईत राहिलो. मुंबईची माहिती नसताना उषा तिथे राहिली. तीन-चार बसगाड्या बदलून तिचा हॉस्पिटलमध्ये रोजचा प्रवास असायचा. सुतार कामातून मिळालेला पैशात घर बांधले. मुलांची लग्ने केली; पण सर्जरीचा खर्च मोठा होता. तो पेलणे कठीण होता. या स्थितीत तिने माझ्यासाठी केलेली खटपट मी कधीच विसरू शकत नाही.'' 

Web Title: jaisingh sutar story