लग्नादिवशीच नवदाम्पत्याकडून श्रमदान!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

अनभुलेवाडीत राबवला अनोखा उपक्रम; दत्तात्रय-मनीषा यांचे कौतुक
बिजवडी - अनभुलेवाडीत (ता. माण) जलसंधारणाची कामे हातात घेतली आहेत. श्रमदानात ग्रामस्थही मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. याच गावातील येळे-किसवे कुटुंबीयांतील दत्तात्रय व मनीषा या नवदाम्पत्याने लग्नादिवशीच गावात श्रमदान करून नावीन्यपूर्ण व आदर्शवत उपक्रम राबवला.

अनभुलेवाडी येथील शंकरराव येळे यांचे चिरंजीव दत्तात्रय व एकनाथ किसवे यांची कन्या मनीषा (रा. लक्ष्मीनगर, ता. माण) यांचा विवाह गुरुवारी (ता. २०) अनभुलेवाडी येथे साधेपणाने साजरा झाल्यानंतर नववधू व वरांनी गावात जावून हातात टिकाव व फावडे घेत श्रमदान करून एक आदर्श निर्माण केला आहे. येळे व किसवे परिवाराकडून लग्नपत्रिकेतही ‘पाणी वाचवा’ हा संदेश देत ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे जलसंधारणात श्रमदान करून आपले गाव जलयुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही करण्यात आले होते. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश देत विवाहाचा विधी पूर्ण झाला की, आम्ही श्रमदान केले. यापुढेही रोज ग्रामस्थांसमवेत श्रमदान करणार आहे, अशी प्रतिक्रिया या नवविवाहित दांपत्याने दिली.

दत्तात्रय व मनीषा या नवदाम्पत्याने विवाहानंतर श्रमदान करून ग्रामस्थांचा उत्साह वाढवला आहे. आपल्या गावात पडणारे पावसाचे पाणी आपल्याच गावात अडवण्यासाठी ग्रामस्थ जलसाक्षर झाले असून शासनाच्या सहकार्याने व लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे करत असताना आपल्या मुला-मुलींच्या विवाहाच्या पत्रिका काढतानाही ग्रामस्थांना, पै-पाहुण्यांना व प्रतिष्ठितांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून देत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश दिला जात आहे. 

Web Title: Labor Day on the wedding day!