अन् वर्गमित्र धावून आले पवार कुटुंबियांच्या मदतीला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 January 2020

स्वातंत्र्यसैनिक आण्णा बाळा पाटील विद्यालयातील 1994 च्या दहावीतील उद्धव पवार यांचे वर्गमित्र व मैत्रिणींनी सामाजिक बांधीलकीतून कुटुंबाला आर्थिक आधार दिला आहे.

तांबवे (जि. सातारा) ः उत्तर तांबवे येथील (कै.) उद्धव पवार यांचे शेतातील भात पीक काढताना हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. उद्धव यांनी गरिबीवर मात करत कसाबसा सावरलेला संसार क्षणात उद्‌ध्वस्त झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबासह तीन मुलींच्या शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यावर मात करण्यासाठी उद्धव यांचे वर्गमित्र व मैत्रिणींनी एकत्र आल्या आणि तब्बल 70 हजारांची मदत केली.

हेही वाचा : टॅक्‍सी चालकाचा प्रामाणिकपणा, 13 लाख केले परत
 

उत्तर तांबवे (ता. कऱ्हाड) येथील (कै.) पवार यांचे शेतातच 4 नोव्हेंबर 2019 रोजी हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. शालेय जीवनात हुशार, होतकरू आणि मितभाषी उद्धवची मित्र परिवारात वेगळीच छबी होती. त्याच्या आकस्मिक निधनाची बातमी त्यांच्या वर्गमित्रांना कळताच तीन दिवसांतच उद्धव यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबीयांना आणि तिन्ही मुलींना शिक्षणासाठी मदत करण्याचा निर्णय त्यांच्या वर्गमित्रांनी घेतला.

त्यानंतर ऍड. विजयसिंह पाटील, आबासाहेब पाटील, महेश पाटील, कृष्णत बाबर, मधुरा यादव, संगीता फल्ले-बेडगे, अरुणा चव्हाण-पाटील, अमेय पाटील, विलास पाटील, भाऊसाहेब पाटील, संतोष पाटील, शुभांगी चव्हाण, उदय थोरात, डॉ. आबासो चव्हाण, जयसिंग माने, रंगराव वरकड, जयसिंग खडंग, रवींद्र पाटील, तात्यासाहेब पवार, सुधीर पवार, प्रताप चव्हाण, सूर्यकांत भोसले, महेश पाटणे, अप्पासाहेब पाटील, आबासाहेब देवकर, धनाजी देवकर, राजेंद्र लोकरे आदींनी तब्बल 70 हजार रुपये जमा केले.

जरुर वाचा :  कोसळलेलं आयुष्य पेलताना..!

त्यापैकी त्यांच्या मुली आदिती, स्वरांजली व नेहा यांच्या नावाने प्रत्येकी 20 हजारांच्या ठेवपावत्या केल्या आहेत. त्याचबरोबर दहा हजार रुपयांची मुलींच्या शैक्षणिक खर्चासाठी तरतूद केली आहे. कर्तव्याची जाणीव ठेवून उद्धवच्या मित्रांनी केलेली आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबास दिलासादायक ठरली आहे. मदत सुपूर्द करताना उद्धव यांच्या पत्नी श्रीमती सुजाता, वडील यशवंत पवार यांना अश्रू अनावर झाले. सातारा सातारा सातारा सातारा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Late Uddhav Pawar's Classmates And Friends Came Forward For Financial support To His Family