राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी लक्ष्मण गोगावले यांनी दिली चार हजार मोफत व्याख्याने

सु. ल. खुटवड
Saturday, 8 February 2020

दहा हजार वर्षांतील वार काही सेकंदांत
गोगावले यांना दहा हजार वर्षांतील कोणतीही तारीख व वर्ष सांगितले, तर त्यादिवशीचा वार ते काही सेकंदांत सांगू शकतात, याची दखल ‘हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’ने घेतली आहे. एक ते हजारपर्यंतचा कोणत्याही आकड्याचा पाढा ते म्हणू शकतात. तसेच, एक ते हजार संख्येपर्यंतची कोणत्याही आकड्याची वर्गसंख्या विचारली तर काही क्षणांत उत्तरही देतात. अर्थात, गणितातील काही युक्‍त्या, समीकरणे व पाठांतरामुळे हे शक्‍य होत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे - शिक्षणाच्या बाबतीत त्यांचे ‘गणित’ फारसे जुळले नाही; पण गणितच सगळ्यांना अवघड जाते, हे ओळखून त्यांनी हा विषय सोप्या पद्धतीने कसा शिकवता येईल, याचा ध्यास घेतला आणि अनेकांच्या आयुष्याचे गणित सोडवले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागावी, यासाठी गेल्या तीस वर्षांपासून लक्ष्मण गोगावले (रा. गोगलवाडी, ता. हवेली) नावाचा अवलिया झटत असून, राज्यातील शेकडो शाळांमध्ये त्यांनी चार हजार मोफत व्याख्याने दिली आहेत. तसेच, स्पर्धा परीक्षांमधील अवघड गणिते सोप्या पद्धतीने कशी सोडवावीत, यासाठी त्यांचे मार्गदर्शन सुरू आहे. 

गोगावले यांची गणित या विषयावर १२ पुस्तके प्रकाशित झाली असून, आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त पुस्तकांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे बॅंकेतील अधिकारी- कर्मचारी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांना मार्गदर्शन करणाऱ्या गोगावले यांचे शिक्षण अवघे दहावीपर्यंत झाले आहे.  

लोकसभेत गोंधळ; राहुल गांधींच्या वक्तव्यावरून, भाजप-काँग्रेस सदस्य भिडले

गोगावले यांची मुलगी प्रियांका लहान असताना, तिला गणिताची भीती वाटायची, त्यामुळे या विषयाकडे तिचे दुर्लक्ष होऊ लागले. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर गणिताशी गट्टी जमवण्यासाठी काय करता येईल, याचा विचार केला. त्यातून साध्या साध्या युक्‍त्या वापरून, गणित सोपे होऊ लागले. आपल्या मुलीला गणिताची गोडी लागल्याचे पाहून, राज्यातील इतर मुलांबाबतही त्यांनी हा प्रयोग करण्याचे ठरवले, त्यातूनच त्यांनी चार हजार व्याख्यानाचा पल्ला गाठला आहे. तसेच, विविध बॅंकांच्या पाचशे शाखांमध्येही गणितविषयक त्यांनी मार्गदर्शन केले आहे. 

गोगावले यांनी भूमितीतील ‘पाय’ची निश्‍चित व अचूक किंमत शोधल्याचा दावा केला असून, लंडन येथील इंटरनॅशल ऑर्गनायझेशन ऑफ सायंटिफिक रिसर्च (आयओएसआर) या जागतिक स्तरावरील संस्थेने त्याची दखल घेतली आहे. 
या संदर्भातील शोधनिबंध सहा आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Laxman Gogavale gave four thousand free lectures for school students across the state