सामाजिक बांधिलकी जपणारा उद्योजक

विशाल जगताप / रणजीत शानभाग
सोमवार, 15 एप्रिल 2019

मधुकर चिंतू माळकरी (मु. संगमनगर, माळकरी पाडा, पो. ता. विक्रमगड) लहानपणापासूनच धडपड्या. त्याने शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर कौशल्य शिक्षणाचा वेगळा रस्ता धरला तो त्याचे शिक्षक गजानन टिळक यांच्या मार्गदर्शनामुळे.  

महाराष्ट्रातील पालघर हा तसा सर्वात तरुण जिल्हा. पालघर जिल्ह्याचा बहुतांश भाग दुर्गम आणि आदिवासी पाड्यांचा. येथील आदिवासी संस्कृतीतील वारली चित्रकला, पारंपरिक गाणी-नृत्य तसेच खाद्य पदार्थ म्हणजे संपूर्ण देशाची शान ! अशा या जिल्ह्यातील माळकरी-पाडा या छोट्याशा वस्तीवरील मधुकर त्याच्या बहुविविध कौशल्य आणि सामाजिक भान राखणाऱ्या व्यवसायाने ग्रामीण तरुणांना आदर्शवत ठरले असे काम करत आहे. मधुकर चिंतू माळकरी (मु. संगमनगर, माळकरी पाडा, पो. ता. विक्रमगड) लहानपणापासूनच धडपड्या. त्याने शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर कौशल्य शिक्षणाचा वेगळा रस्ता धरला तो त्याचे शिक्षक गजानन टिळक यांच्या मार्गदर्शनामुळे.  

पाबळच्या विज्ञान आश्रमातील ‘हाताने काम करत शिकण्याची’ पद्धत मधुकरला खूपच भावली. येथील बहुविविध कौशल्य शिक्षणामुळे मधुकरला त्याच्या आवडीबरोबरच ‘कसे आणि काय शिकायचे’ हे कळायला लागले. विज्ञान आश्रमातील एक वर्षाचा DBRT पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अनुभवासाठी मधुकरने पुण्यातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवड या शाळेत कौशल्य शिक्षण निदेशकाचे काम केले. या कामातून त्याला व्यावसायिकता आणि सामाजिक बांधिलकीचे धडे मिळाले. हेच काम स्वतःच्या गावत आपल्या लोकांसाठी करण्यचा निश्चय करून मधुकरने २०१४ साली गाव गाठले.  

पालघर सारख्या दुर्गम आणि मागास भागात कोणत्याही एकाच व्यवसायावर अवलंबून न राहता मिळेल त्या संधीचे सोने करावे लागेल हे आतापर्यंतच्या अनुभवावरून मधुकरच्या लक्षात आले होते. त्याने २०१५ मध्ये उसाचे रसवंतीगृह सुरू केले. त्यानंतर वर्षभरात मित्राच्या मदतीने स्वतःचे वेल्डिंग वर्कशॉप सुरू केले. यातून शेतीची अवजारे बनविण्याचे काम चालू झाले. डोंगर उताराच्या जमिनी आणि सारखा खंडित होणारा विद्युतपुरवठा यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना ते वापरता येत नाही, हे मधुकर अनुभवत होता. यावर उपाय म्हणून ‘पेडल पंपाचा’ मार्ग सापडला. मधुकरने ते स्वतःच्या शेतावर वापरून पाहिल्यावर त्याची विक्री आणि शेतकऱ्यांसाठी मोफत प्रशिक्षणही चालू केले. शेतकऱ्यांची कामे करताना ओघाने शेतीच्या इतर समस्यांवरही विचार सुरू होता. त्यातूनच नैसर्गिक शेतीच्या प्रयोगाचा भाग म्हणून देशी गाईंचे संगोपन चालू केले. डांगी जातीच्या सात गाई घेऊन जीवामृत, गोमूत्र, धूपकांडी, गांडूळ खतनिर्मिती सुरू केली. बोलका स्वभाव आणि सामाजिक बांधिलकीतून मिळवलेला जनसंपर्क यामुळे परिसरातील इतर १५ शेतकऱ्यांना विविध सामाजिक संस्थांच्या मदतीतून डांगी गाई घेऊन दिल्या. हे व्यवसाय सुरू असतानाच त्याने घरातील मंडळींना मदतीला घेऊन वारली चित्रकलेतून तयार केलेल्या शोभेच्या वस्तूंची विक्री सुरू केली. तसेच विक्रमगड हायस्कूल, विक्रमगड येथील शाळेवर आठवड्यातील दोन दिवस पूर्व-व्यावसायिक शिक्षणाचा निदेशक म्हणूनही तो काम करतो.  

मधुकरच्या कामाचा आवाका वाढत आहे. त्याने आता ‘धरतरी ग्रामद्योग संकुल’ या नावाने एक सामाजिक संस्थेचे कामही सुरू केले आहे. या संस्थेच्या माध्यमातून परिसरातील शाळांमध्ये संस्कार शिबिरे, कार्यकेंद्रित शिक्षण आणि समाज प्रबोधनाचे काम तो करत आहे. ‘जो मनुष्य एकच काम करतो तो आयुष्यभर एकाच कामाने समाधानी राहतो पण जो मनुष्य चार वेगवेगळी कामे करतो तो पाचवे काम शिकून ते सहज आत्मसात करू शकतो’ असे मधुकर ठामपणे सांगतो. पालघरसारख्या मागास भागातही संधींची काहीच कमतरता नसून या भागातील तरुणांना काही मदत करता आली तर आनंदाने करण्याची मधुकरची तयारी आहे.  
 : मधुकर चिंतू माळकरी, ९८९०७३३०९२
मु. संगमनगर (माळकरी पाडा), पो. ता. विक्रमगड, जि. पालघर . 
 : विशाल जगताप, ९७३०००५०२५


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhukar Malkari Entrepreneur