Success Story : शेतकऱ्याने बनवली स्वयंचलित ठिबक प्रणाली

Success Story : शेतकऱ्याने बनवली स्वयंचलित ठिबक प्रणाली

वीजपंपाच्या स्टार्टरला स्वतःच्या अभ्यासाने, निरीक्षणाने प्रोग्रॅमेबल टायमर पॅनेल बसवून स्वयंचलित ठिबक संच प्रणाली तयार करण्याची किमया ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथील मनोज पुजारी या शेतकऱ्याने करून दाखवली आहे. विशेष म्हणजे बाजारात लाख-दीड लाखाच्या घरात असलेली ही प्रणाली पुजारी यांनी मात्र अवघ्या सात हजारांत बनवली आहे, हे त्याचे वैशिष्ट्य म्हणता येईल. 

पुजारी यांनी डिप्लोमा इन इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिकची पदविका घेतली आहे. त्यांच्याकडे पूर्वी दहा-बारा एकर ऊस होता. या उसासाठी बसवलेल्या ठिबक संचाला स्वयंचलित करण्याच्या उद्देशातूनच ते या प्रणालीपर्यंत पोचले. अर्थात, त्यासाठी तब्बल १०-१२ वर्षे त्यांनी घालवली. २०१७ मध्ये प्रत्यक्षात त्यात त्यांना यश मिळाले. याबाबत बोलताना पुजारी म्हणाले, की पाण्यासह वीज, खते आणि कृषी रसायने नेमकेपणाने मिळतातच, पण महत्त्वाचे म्हणजे वेळ आणि पैसाही या प्रणालीमुळे वाचू शकतो. शिवाय हाताळणीही सोपी आहे. शेतकऱ्यांना निश्‍चितच ती फायद्याची आहे, असे ते म्हणाले. 

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

काय आहे प्रणाली 
ठिबक संचाद्वारे पिकांना पाणी सोडण्यासाठी प्रोग्रॅमेबल टायमर पॅनेलच्या माध्यमातून पुढील २४ तासांदरम्यानचे ठिबक संचाचे टायमिंग यावर सेट केले जाते. आपल्याला कधी आणि किती वेळ पाणी द्यायचे आहे, हे त्यात ठरवता येते, तसेच ऐनवेळी मध्येच लोडशेडिंगमुळे वीज गेलीच, तर पुन्हा वीजपंप सुरू करण्याची गरज नाही, आधी नोंदवलेल्या वेळेनुसार आपले उर्वरित काम ही प्रणाली पूर्ण करते. 

कमी खर्च, हाताळणीही सोपी 
बाजारात आज काही खासगी कंपन्यांची ठिबक संचाची स्वंयचलित प्रणाली उपलब्ध आहे, पण त्याची किंमत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे. पण ही प्रणाली पूर्णपणे देशी बनावटीची आहे. यासाठीचे सर्व सुटे भाग स्थानिक बाजारपेठत उपलब्ध आहेत, शिवाय ते बसविण्यास व हाताळण्यास कुशल तंत्रज्ञांची गरज नसून, शेतकरी स्वतः ते हाताळू शकतात आणि महत्त्वाचे म्हणजे यासाठी केवळ ५ ते ७ हजारांचा खर्च आहे. 

ही आहेत वैशिष्ट्ये 
ही प्रणाली फक्त विजेच्या थ्री फेजवर चालते. 
या प्रणालीवर तास आणि मिनिट अशी वेळ नोंदविण्यासाठी स्वतंत्रपणे दोन बटणे आहेत. त्याद्वारे आपल्याला हवा तो वेळ आपण सेट करू शकतो. 
विजेच्या चढ-उतारापासून पंपाचे संरक्षण करण्यासाठी सिंगल फेजिंग प्रीव्हेंटरची सोय असल्याने पंप जळण्याची शक्यता नाही. 
अनेक वेळा हवा धरून पंप रिकामा फिरतो, या परिस्थितीत पंपाला जळण्यापासून ही प्रणाली वाचवते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com