दुसऱ्यांच्या जगण्याचा अर्थ शोधण्याचा 'अजेंडा' 

दुसऱ्यांच्या जगण्याचा अर्थ शोधण्याचा 'अजेंडा' 

अमरावती : आयुष्यात काय करायचे हे ठरविण्याऐवजी 'काय करायचे नाही' हे त्यांनी ठरविले अन्‌ वेगळ्याच वाटेवर वाटचाल सुरू झाली. माणसे जोडणाऱ्या, घडविणाऱ्या, उभी करणाऱ्या, बळ अन्‌ प्रेरणा देणाऱ्या या अनोख्या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली. जगण्याचा अर्थ ज्यांना समजला नाही, त्यांना तो शोधण्यासाठी मदत करणे, हा त्यांच्या जगण्याचा अजेंडा. गेल्या साडेतीन दशकांपासून माणसाला माणूसपण शोधण्यासाठी मदत करणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे डॉ. अविनाश सावजी. 
एकीचे बळ काय असते हे पाहायचे असेल तर अमरावतीच्या 'प्रयास' संस्थेला नक्की भेट द्या. 

'मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंजिल मगर 
लोग साथ आते गये और कारवॉं बनता गया...' 

मजरूह सुलतानपुरी यांच्या या शेरची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. एका व्यक्तीने केलेला 'प्रयास' किती माणसांचे जीवन बदलून टाकतो, हे तेथे गेल्यावरच कळते.

'एमबीबीएस' झाल्यावर ज्या माणसाकडे स्टेथोस्कोपसुद्धा नव्हता, त्याने आज देशभरातील माणसे जोडली; त्यांना जगण्याचे बळ दिले; अन्‌ अनेकांना प्रेरित केले. 
पांढरी बंडी, पायजामा हाच डॉ. सावजींचा पेहराव. कमीतकमी गरजांमध्ये जगणे आणि स्वतःच्या क्षमतेचा शोध घेण्याची ही चालतीफिरती प्रयोगशाळाच. 'एमबीबीएस' करताना स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचे दहा खंड वाचले. महात्मा गांधी, विनोबा, साने गुरुजी सगळे वाचून झाले. डॉक्‍टर झाल्यावर नोकरी किंवा स्वतःचे रुग्णालय सुरू करायचे नाही, तर समाजासाठी जीवन समर्पित करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. 

मार्च 1995 मध्ये माधान येथे 'प्रयास' या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. 2007 पर्यंत येथेच आरोग्य, शिक्षण, मोबाईल डिस्पेन्सरी, गावागावांत आरोग्य शिबिरे सुरू होती.

प्रबोधन, लोकशिक्षणावर भर होता. आठ ते दहा गावांतील झोपडपट्टीतील दोन हजारांवर मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. 2007 मध्ये ते अमरावतीत आले. भाड्याच्या खोलीत 'प्रयास'चे कार्यालय सुरू केले. लोकांना जमवणे, त्यांना प्रेरणा देणे, विविध प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी प्रयत्न, त्याला संशोधन व विकासाची जोड देण्यात आली. त्यातच 'प्रयास'च्या सेवांकुर या प्रेरणादायी शिबिरांना सुरवात झाली, तरुणाई बहरत गेली. त्यातूनच आम्ही 'बि'घडलो, तुम्ही 'बि' घडानां' या उपक्रमाची भर पडली. अमरावती, यवतमाळ, नागपूर अशा ठिकाणी प्रेरणादायी कार्यक्रम झाले. अन्‌ ध्येयवादी तरुणांची फौज उभी राहिली. 'सेवांकुर लिटिल चॅम्प्स्‌'च्या माध्यमातून वेगवेगळ्या आजारांनी व समस्यांनी ग्रासलेल्या पण जगण्यावर प्रेम करणाऱ्या, खडतर आयुष्य जगणाऱ्या लहानग्यांचा समूह तयार केला अन्‌ त्यांना 'आयडॉल' बनवून लोकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधला. 

2014 मध्ये अमरावतीच्या फरशी स्टॉप भागात 'प्रयास'ची नवी इमारत झाली. अभ्यासिकेत आता 250 मुले शिकत आहेत. स्पर्धा परीक्षांचा तयार करतात. विविध उपक्रमांतून परिवर्तनाची साखळी कार्यरत झाली. नव्या वर्षात 18 वर्षांवरील दिव्यांगांसाठी डे-केअर सेंटर, हेल्पलाइन, लाइफ स्किल एज्युकेशन, नातेसंबंध, पालकत्व, नेतृत्व विकास, व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांत नवी झेप घेण्यास संस्था सज्ज आहे. 

'प्रयास'चे कार्य 1994 पासून सुरू आहे. दहा हजारांवर व्यक्ती, दोन-तीनशे संस्था 'प्रयास'शी जोडल्या गेल्या आहेत. समाजातील प्रश्‍नांवर विज्ञाननिष्ठ उत्तरे सोडून ते कार्यवाहीत आणण्याचा प्रयत्न करतो. 
- डॉ. अविनाश सावजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com