हसत-खेळत, नाचत-बागडत झालं "तिचं' सेलिब्रेशन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

नगर - रोजचे धकाधकीचे जीवन खरे तर महिलांसाठी अधिकच धकाधकीचे असते. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या महिलांना, तर कौटुंबिक जबाबदाऱ्याही पार पाडाव्याच लागतात. त्यातून त्यांना काहीसा विरंगुळा मिळावा आणि मनसोक्त व्यक्त होता यावे, सर्व चिंता विसरून एक दिवस आपल्या मनासारखे विहरता यावे, ही प्रत्येकीची मनापासून इच्छा असते. तिची ही इच्छा जागतिक महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर फलद्रूप झाली "ती'चं सेलिब्रेशन' या सोहळ्यात.

गेला रविवार हा फक्त आणि फक्त महिलांना समर्पित करण्यासाठी सकाळ सोशल फाउंडेशनने पुढाकार घेतला. महिलांना करमणूक आणि स्वतःच्याही अन्य कलागुणांना मुक्त वाट मिळवून देण्यासाठी, तिला "हटके' खरेदीची संधी देण्यासाठी सकाळ सोशल फाउंडेशन व भूमिका ग्रुपतर्फे रविवारी (ता. 11) नगरमध्ये "ती'चं सेलिब्रेशन' हा विशेष सोहळा झाला.

शहर आणि परिसरातील सर्व क्षेत्रांतील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या सोहळ्याचा आनंद लुटला. हा सोहळा सर्व वयोगटांतील महिलांसाठी खुला होता.

उद्योजक रंजना खिलारी यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्‌घाटन झाले. "सकाळ'चे निवासी संपादक ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील, दिनेश गोपलानी, आशिष गुप्ता, अमोल सुरसे, मकरंद घोडके, नीता खेडकर, प्रवीण पांडे, अमोल खोले, ऍड. सविता बोठे पाटील, भूमिका ग्रुपच्या सदस्य प्रिया बापट, धनश्री खोले, कीर्ती खेडकर, अमृता बेडेकर, केतकी जोशी, अबोली सराफ, मधुरा झावरे, सायली खिस्ती, प्रिया खताळ, दीपा चोपडा व रेणुका कुमठेकर व्यासपीठावर उपस्थित होत्या.

सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेल्या अनेक महिलांनी शॉपिंग व खाद्यमहोत्सवाचा, तसेच ज्वेलरी, कपडे, मोबाईल, इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांच्या खरेदीचा आनंद लुटला. या वेळी नारीशक्तीची महती सांगणारा पोवाडा सादर केला गेला. तसेच, विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nagar news tich celebration event women