ले. वैष्णवीच्या स्वप्नपूर्तीला अश्रूंची झालर!

दिनकर गुल्हाने
शुक्रवार, 16 मार्च 2018

पुसद - आपल्या मुलीने वैष्णवीने सैन्यदलात अधिकारी व्हावे ही वडील प्रदीप मुनिग्याल यांची इच्छा. पण पाच महिन्यांपूर्वी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे आई छायानेच ‘बाप’ बनत वैष्णवीला धीर दिला. अत्यंत कठीण प्रशिक्षण घेत वैष्णवी लेफ्टनंट बनली. चेन्नईत नुकत्याच झालेल्या सोहळ्यात सैनिकी पोषाखातील वैष्णवीने आईला कवटाळले तेव्हा आईला अश्रू आवरता आले नाहीत. 

वैष्णवी ही प्रदीप व छाया मुनिग्याल यांची कन्या. पुसदमधून बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर तिने पुण्याच्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई.(मेकॅनिकल)ची पदवी मिळवली. एका कंपनीत रुजूही झाली. परंतु वैष्णवीने सैन्यात जाऊन देशसेवा करावी, हे वडिलांचे स्वप्न तिला स्वस्थ बसू देत नव्हते.

अखेर तिने नोकरी सोडली व सेनेत शॉर्ट सर्व्हिस कमिशन मिळविले व राष्ट्रीय चाचणीत यशस्वी झाली. चेन्नई येथील ११ महिन्यांचे प्रशिक्षण तिने जिद्दीने पूर्ण केले. घोडेस्वारी, पोहणे, धावणे, फुटबॉल, बेसबॉल यात प्रावीण्य पटकाविले. वडिलांच्या निधनानंतर आई छायाने तिला धीर दिला. अखेर सेनेत ‘लेफ्टनंट’ बनून तिने वडिलांची इच्छापूर्ती केली.

पहिली लेफ्टनंट ‘तनिष्का’!
लेफ्टनंटपदी निवड झाल्यानंतर वैष्णवीने पुसद येथील ‘तनिष्का’ गटाचे सदस्यत्व स्वीकारले. यवतमाळ जिल्ह्यातील पहिली महिला लेफ्टनंट म्हणून तिला गौरव प्राप्त झाला. ‘मुली कुठल्याही क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकतात. मुलींनी कठोर मेहनत, प्रचंड आत्मविश्‍वास बाळगत ध्येय साध्य करावे, आभाळ जिंकण्याची इच्छाशक्‍ती ठेवावी’, असा संदेश देत ‘मी ‘तनिष्का’ असल्याचा सार्थ अभिमान वाटतो’, अशी लेफ्टनंट वैष्णवी ‘सकाळ’शी बोलताना म्हणाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pusad news lieutenant vaishnavi munigyal success motivation