सालगड्याशी माणुसकीचे नाते

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 जानेवारी 2019

कळस - शेतमजुराच्या मुलीच्या लग्नातील खर्चाची जबाबदारी घेत तिच्या कन्यादानापर्यंतचे सगळे सोपस्कार पार पाडून पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप देत पळसदेव (ता. इंदापूर) येथील शरद काळे पाटील यांचा सालगड्यासोबत असलेल्या माणुसकीच्या नात्याचा प्रत्यय आला. 

काळे पाटील यांनी त्यांच्या शेतात शेतमजुराचे काम करणाऱ्या सतीश श्रीपती कुचेकर यांच्या मुलीचा विवाह स्वखर्चातून आज थाटामाटात लावून दिला.सतीश कुचेकर हे गेल्या तीस वर्षांपासून शेतमजूर म्हणून काम करतात. त्यांची पत्नी आशाबाई या काळे पाटील यांच्याकडे घरकाम करतात.

आतापर्यंत प्रामाणिकपणे काम करत असलेल्या कुचेकर कुटुंबाला काळेपाटील घरच्या सदस्यांप्रमाणे वागणूक देतात. कुचेकर यांची मुलगी निकिता हिचे लग्न शिर्सुफळ (ता. बारामती) येथील शशिकांत घोडे यांच्यासोबत निश्‍चित झाले. परंतु, लग्नाचा खर्च करण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने कुचेकर यांना लग्न पार पाडण्याची काळजी वाटत होती. त्यांची ही समस्या शरद काळे यांचे बंधू व नवी मुंबई येथे महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले नितीन काळे पाटील यांनी जाणली. त्यांनी शरद काळे पाटील यांना या लग्नाची जबाबदारी पार पाडण्याची सूचना केली.

यानंतर लग्नाच्या तयारीला वेग आला. मानपानाचा बस्ता, नवरी मुलीला द्यायचे प्रापंचिक साहित्य, नवरदेवाच्या मिरवणुकीची तयारी, वऱ्हाडी मंडळींना अन्नदान अगदी सगळी तयारी झाली. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या मुहूर्तावर हे लग्न उत्साहात पार पडले. या वेळी नवरी मुलीचे कन्यादानही शरद काळे पाटील व त्यांच्या पत्नी सुरेखा यांनी केले.

सतीश कुचेकर म्हणाले, ‘‘सुमारे २० रुपये रोजंदारी मिळत असल्यापासून मी काळे पाटील यांच्याकडे काम करत आहे. आज रोजंदारीत वाढ झाली असली, तरी त्याच्या कितीतरी पटीने त्यांच्यासोबत जिव्हाळा निर्माण झाला आहे. माझ्या मुलीचे कन्यादान करून त्यांनी समाजाला दातृत्व दाखवून दिले’’
शरद काळे पाटील म्हणाले, ‘‘सुमारे सव्वा लाखांहून अधिक खर्च या लग्नासाठी झाला आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने व आपणही समाजाचे काही देणे लागत असल्याची भावना ठेवून कुचेकर यांच्या मुलीच्या लग्नाच्या खर्चाची जबाबदारी घेतली. समाजातील लोकांनी पुढे येऊन प्रत्येक गरिबाला मदत करणे गरजेचे आहे.’’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marriage Humanity Motivation Sharad Kale Patil