एमआयटीतील विद्यार्थ्याने तयार केला ‘टू इन वन’ पंप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

औरंगाबाद - नावीन्याचा ध्यास असल्यास यश नक्कीच मिळते. असेच यश शरद शिवाजी पांचाळ या विद्यार्थ्याला मिळाले आहे. त्याने फवारणी यंत्र तसेच वॉटर पंप म्हणून उपयोग होईल असा पेट्रोलवर चालणारा पंप तयार केला आहे. विशेष म्हणजे, या टू इन वन पंपाचे पेटंटसुद्धा शरदला मिळाले आहे. हा पंप शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. 

औरंगाबाद - नावीन्याचा ध्यास असल्यास यश नक्कीच मिळते. असेच यश शरद शिवाजी पांचाळ या विद्यार्थ्याला मिळाले आहे. त्याने फवारणी यंत्र तसेच वॉटर पंप म्हणून उपयोग होईल असा पेट्रोलवर चालणारा पंप तयार केला आहे. विशेष म्हणजे, या टू इन वन पंपाचे पेटंटसुद्धा शरदला मिळाले आहे. हा पंप शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. 

शरद मूळचा वाखारी (ता. वसमत) येथील असून, त्याने पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत घेतले. सध्या तो औरंगाबादेत एमआयटीत बी.टेक. द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. शरदला गावाकडे सात एकर जमीन आहे. शेतात तसेच परिसरात भारनियमनामुळे शेतकऱ्यांना विहिरीतून पाणी काढण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, हे त्याने अनेकदा पाहिले होते. मग त्याने शेतकऱ्यांना पाणी काढता येईल असे यंत्र तयार करता येईल का, यावर विचार करण्यास सुरवात केली. त्याने इंपेलरमध्ये बदल करून यंत्र बनविण्यास सुरवात केली. १ एचपीची मोटार हेड, फवारणी यंत्रही आणले. चार महिने प्रयत्न करूनही यश मिळाले नाही. मात्र, यानंतर केलेला प्रयत्न यशस्वी ठरला. यातून टू इन वन असे फवारणी यंत्र तसेच १ एचपीचा वॉटर पंप तयार झाला. 

एक लिटर पेट्रोलमध्ये चालते तीन तास
शरदने तयार केलेला पंप एक लिटर पेट्रोलवर तीन तास चालतो. या तीन तासांत दीड हजार लिटर पाणी भरता येते. तसेच यातून फवारणीही शक्‍य आहे. यासाठी त्याला मित्र सय्यद आसिफ, उमेश निंबाळकर यांचीही वेळोवेळी मदत झाली. 

दीड महिन्यात मिळाले पेटंट
शरदने पेटंटसाठी ऑनलाइन अर्ज केला होता. त्याला दीड महिन्यानंतर इंटेलेक्‍च्युअल प्रॉपर्टी इंडियाकडून १३ एप्रिल २०१८ रोजी पेटंट मिळाले. हे पेटंट मिळविण्यासाठी त्याचे काका बालाजी पांचाळ यांनी त्याला आर्थिक, तांत्रिक मदत केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIT Student made Two in One Pump