वडिलांचा शब्द मुलांनी केला पूर्ण!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

औंध - खटाव पंचायत समितीच्या माध्यमातून नागाचे कुमठे येथील गंजीच्या माळावर अंगणवाडी मंजूर झाल्यामुळे महत्त्वाची समस्या दूर झाल्याचे समाधान होत असल्याचे प्रतिपादन माजी पोलिस अधिकारी जयवंतराव मांडवे यांनी केले. दरम्यान, अंगणवाडी उभारण्यासाठी जागा देवून वडिलांनी दिलेला शब्द मुलांनी पूर्ण केल्याने ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे. 

खटाव पंचायत समितीच्या माध्यमातून नागाचे कुमठे (ता. खटाव) येथे अंगणवाडी बांधण्यासाठी सहा लाख रुपये निधी उपलब्ध झाला असून, इमारतीच्या पायाभरणीप्रसंगी श्री. मांडवे बोलत होते. यावेळी धबाभाऊ मांडवे, विश्वासराव मांडवे, अधिकराव मांडवे, बाबूराव मांडवे, सचिन मांडवे, दत्ता मांडवे, संतोष मांडवे, हणमंत मांडवे, उद्धव मांडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. मांडवे म्हणाले, ‘‘येथे अंगणवाडी व्हावी, यासाठी ग्रामस्थांनी सतत पंचायत समितीकडे पाठपुरावा केला. आमच्या मागणीचा विचार करून तातडीने अंगणवाडी मंजूर झाल्याने गंजीचा माळ परिसरात लवकरच लहानग्यांचा किलबिलाट आपल्या सर्वांच्या कानी येईल.’’ येथील नागरिकांचा मूलभूत प्रश्न मार्गी लागला असल्याचेही मांडवे यांनी सांगितले.

दरम्यान, गंजीचा माळ या ठिकाणी अंगणवाडी बांधण्यासाठी कुमठे येथील रामचंद्र मांडवे यांनी ग्रामस्थांना शब्द दिलेला होता. मात्र, त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव सचिन मांडवे व संतोष मांडवे या दोन्ही बंधूंनी अंगणवाडीस कायमस्वरूपी जागा देऊन वडिलांनी आपल्या गावाला दिलेला शब्द पूर्ण केला. त्यांचे या कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagache Kumathe Anganwadi Sanction Motivation Initiative