निवृत्तिवेतनातून गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

पर्यावरण रक्षणाबाबत संवेदनशील
चिंतुकाका पर्यावरण रक्षणाबाबत संवेदनशील आहेत. गेल्या वीस वर्षांत त्यांनी घराच्या व शेताच्या परिसरात सुमारे पाचशे झाडे लावली आहेत आणि ती जगवली सुद्धा आहेत.

कडूस येथील ९८ वर्षीय चिंतामण गोडसे यांचा आदर्श; २२ वर्षांपासून उपक्रम सुरू
कडूस - कडूस (ता. खेड) येथील ९८ वर्षांचे चिंतूकाका ऊर्फ चिंतामण दत्तात्रेय गोडसे गेल्या बावीस वर्षांपासून स्वतःच्या निवृत्तिवेतनातून गावातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत आहेत. या दातृत्वशील काकांचा कडूस ग्रामस्थ व रामभाऊ म्हाळगी विद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्यदिनी सत्कार करण्यात आले.

कडूस व परिसरात लहान थोरांना परिचित असलेल्या चिंतुकाकांनी मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या माध्यमातून चाळीस वर्षे देशसेवा केली. १९८० मध्ये क्‍लास वन गॅझेटेड ऑफिसर म्हणून निवृत्त झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कॉमर्सचे शिक्षण पूर्ण केलेल्या चिंतूकाकांची वयाचे शतक गाठायला आली तरी शिक्षणाबद्दलची त्यांची गोडी आजही तशीच टिकून आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ते गेल्या बावीस वर्षांपासून गुणवंत विद्यार्थ्यांना स्वतःची शिष्यवृत्ती देत आहेत. मुख्य म्हणजे रोख स्वरूपात देण्यात येत असलेल्या या शिष्यवृत्तीसाठी त्यांनी स्वतःच्या निवृत्तिवेतनातून सोय केली आहे. शिष्यवृत्तीसाठी बॅंकेत कायमस्वरूपी ठेव ठेवली आहे. त्याच्या व्याजातून ते ही शिष्यवृत्ती दरवर्षी देतात.

गावात सोळा जिल्हा परिषदेच्या शाळा तर एक रामभाऊ म्हाळगी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे. जे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवतील त्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ग्रामपंचायतसमोरील सार्वजनिक ध्वजवंदन प्रसंगी शिष्यवृत्तीची रोख रक्कम दिली जाते. या वर्षीच्या शिष्यवृत्तीचे वाटप चिंतुकाकांच्या उपस्थितीत करण्यात आले. अशा या चिंतुकाकांचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने कडूस शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशोक गारगोटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच जयश्री नेहेरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, रामभाऊ म्हाळगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मृदुला कापरे, निवृत्ती नेहेरे, अशोक बंदावणे, शिक्षण मंडळाचे सर्व संचालक, विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pension Clever Student Scholarship Chintaman Godase Motivation