विद्यार्थ्यांनी लुटले आनंदी क्षणांचे सोने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

पिंपरी - भोर-महाड रस्त्यावरील वेनवडी गावाजवळील कातकरी वस्ती येथील  मुला-मुलींना शाळेत जाण्यास जास्त पायपीट करावी लागू नये म्हणून ‘सायकल मित्र’ आणि साद प्रतिष्ठान, पुणे मार्फत त्यांना दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ११ सायकली भेट देण्यात आल्या. त्या वेळी शालेय मुले आणि ‘सायकल मित्रां’नी आनंदी क्षणांचे जणू सोनचं लुटलं. 

पिंपरी - भोर-महाड रस्त्यावरील वेनवडी गावाजवळील कातकरी वस्ती येथील  मुला-मुलींना शाळेत जाण्यास जास्त पायपीट करावी लागू नये म्हणून ‘सायकल मित्र’ आणि साद प्रतिष्ठान, पुणे मार्फत त्यांना दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ११ सायकली भेट देण्यात आल्या. त्या वेळी शालेय मुले आणि ‘सायकल मित्रां’नी आनंदी क्षणांचे जणू सोनचं लुटलं. 

पिंपरी-चिंचवडमधील ‘सायकल मित्र’ ग्रुपच्या सदस्यांनी वेनवडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला १५ ऑगस्टला भेट दिली होती. त्या वेळी, तेथील कातकरी वस्तीमधील मुला-मुलींना शाळेत येण्यासाठी दररोज लांब पायपीट करावी लागत असल्याचे सदस्यांच्या लक्षात आले. त्यातील काही सदस्य हे पुण्यातील साद प्रतिष्ठान संस्थेशीही जवळून संबंधित होते. त्यामुळे, त्यांनी ‘व्हॉटस्‌ॲप ग्रुप’वरून लगेचच आवाहन केले. त्यामधून आपापल्या परिचित व्यक्तींपर्यंत पोचून त्यांना लहान-मोठ्या ११ जुन्या सायकली मिळाल्या.

मुलांना त्या वापरण्याजोग्या व्हाव्यात म्हणून त्यांची दुरुस्ती करण्यात आली. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर त्या सायकली मुलांना मिळाव्यात यासाठी त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक भीमराव शिंदे यांना संपर्क साधून त्यांना त्याची पूर्वकल्पना दिली.

जुन्या सायकली गोळा करण्यासाठी ठिकठिकाणी उन्हा-पावसात धावलेले गणेश मारकड, महेश व्यवहारे, जितेंद्र माळी, सुनील ननवरे यांचे त्यासाठी बहुमोल योगदान राहिले. ‘सायकल मित्र’ जयंत मरोळकर यांच्या मदतीने फरीद अहमद यांनी इतरांना अधिक कष्ट  होऊ नयेत म्हणून स्वतःच्या गाडीने त्यांच्याकडे सुपूर्द केल्या. नवनाथ वाघमोडे, जितेंद्र माळी यांनी आपापल्या भागांतच सायकली दुरुस्त करुन घेतल्या. धनंजय शेडबाळे यांनीही चाकण वरुन एक सायकल प्राधिकरणात आणून ठेवली.

याशिवाय, सुभाष नेवसे, मनमीत सिंग, बाळू जोशी आदींनी तन-मन-धन आणि समर्पित भावनेने योगदान दिले. भोर तालुक्‍याचे गट विकास अधिकारी (बीडीओ) संतोष हराळे, पोलिस निरीक्षक दगडू हाके, ‘साद’चे विश्‍वस्त श्री. व  सौ. श्रीकांत खटके, सरपंच अलका शिंदे, उपसरपंच सुषमा शिंदे आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri pune news cycle gift to student