esakal | आत्या-भाचीच्या नात्यातली निरागस देवाणघेवाण 
sakal

बोलून बातमी शोधा

आत्या-भाचीच्या नात्यातली निरागस देवाणघेवाण 

घरातल्या मंडळींकडून काही संदर्भ प्रिशाच्या कानावर पडत असतात. आत्तू काही तरी अनोखं काम करते,हे तिच्या बालमनावर ठसलं आहे.आत्तूसारखं होण्यासाठीची तिला सुचणारी पायरी म्हणजे आत्तूसारखी कामं करायची धडपड

आत्या-भाचीच्या नात्यातली निरागस देवाणघेवाण 

sakal_logo
By
नीला शर्मा

प्रिशा ही चार वर्षांची मुलगी सगळं काही अगदी तिच्या आत्येसारखं करू पाहते. तिची आत्या मनीषा कुंभार, या उपजिल्हाधिकारी आहेत. हे पद जरी प्रिशाला अजून कळत नसलं तरी "माझी आत्तू खूप मोठ्ठं काम करते. मलापण तिच्यासारखं काम करायचं आहे,' असं ती तिच्या मित्रमैत्रिणींना रुबाबात सांगत असते. आत्तूसारखं सरबत बनवणं, भाजी निवडणं, पुस्तकं वाचणं, सगळ्या वस्तू नीटनेटक्‍या ठेवणं, छायाचित्रण वगैरेचं अनुकरण प्रिशा करते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लहानगी प्रिशा मिलिंद कुंभार सरबत करून देते तेव्हा तिच्या आत्तूला (म्हणजे आत्या मनीषा कुंभार यांना) ते जगातलं सगळ्यात जास्त मस्त सरबत वाटतं. मनीषा सध्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (भूविभाग), पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण या पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्या उपविभागीय अधिकारी, राधानगरी, कागल उपविभाग, कोल्हापूर या पदावर होत्या. अकरा वर्षांपूर्वी त्या उपजिल्हाधिकारी झाल्यावर सातारा, सांगली व सोलापूर आदी ठिकाणी निरनिराळ्या महत्त्वाच्या पदांवर त्यांनी कामगिरी बजावली. घरातल्या मंडळींकडून यांतले काही संदर्भ प्रिशाच्या कानावर पडत असतात. आपली आत्तू काही तरी अनोखं काम करते, हे तिच्या बालमनावर ठसलं आहे. आत्तूसारखं होण्यासाठीची तिला सुचणारी एक-एक पायरी म्हणजे आत्तूसारखी कामं करायची धडपड. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रिशा म्हणाली, ""आत्तूला मी लिंबू सरबत करून देते. तिची पुस्तकं नीट लावायला मदत करते. आत्तूची पुस्तकं मोठी आणि जड असतात. मी तिला विचारते की, या पुस्तकात कशाची गोष्ट आहे. मग ती मला त्याच्यातली गोष्ट सांगते. ती फायली तपासत बसते तेव्हा मी पण माझी वही घेऊन बसते. माझा कैवल्यदादा मला क्रिकेट आणि फुटबॉल खेळायला बोलावतो. तो चित्रं काढतो. मी पण मस्त चित्र काढते. आत्तू अगदी मजेशीर योगासनं करते. तिनं मलासुद्धा धनुरासन, नौकासन आणि सूर्यनमस्कार शिकवले आहेत. मी तिच्यासारखी पोळी लाटते, तेव्हा मला भारी वाटतं.'' 

मनीषा यांनी सांगितलं की, प्रिशाला माझ्यासारखं छायाचित्रं काढायला शिकायचं आहे. कामातून जास्त दिवसांची सुटी मिळाल्यावर मला अभयारण्यांमध्ये फेरफटका मारायला आवडतं. कान्हा, जिम कॉर्बेट, रणथंभौर, पेंच, ताडोबा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, राधानगरी व चांदोली या अभयारण्यांमधली मी काढलेली छायाचित्रं मन लावून पाहात बसणं, हा प्रिशाचा लाडका छंद. कधीतरी मी तिला अशा सफरींना माझ्याबरोबर घेऊन जाते. परत आल्यावर ती भेटेल त्याला तिथल्या गोष्टी सांगताना रंगून जाते. आता तर माझी बदली पुण्यातच झाल्यामुळे आम्ही जास्त वेळ एकमेकींकडून काही शिकत असतो. तिचं खळखळून हसणं, प्रचंड उत्साह आणि आनंदी राहण्याची वृत्ती मलाही अत्यंत सकारात्मक नवी ऊर्जा देत राहते.