चार वर्षांपासून ६० निराधार कुटुंबांना दरमाह घरपोच किराणा

पांडुरंग उगले
बुधवार, 16 मे 2018

माजलगाव - एकीकडे तरुणाई बिघडत चालल्याची ओरड होत असताना शहरातील मुस्लिम तरुणांनी अल फलाह कमिटीच्या माध्यमातून समाजकार्याचा वसा हाती घेतला आहे. चार वर्षांपासून ६० निराधार कुटुंबांना घरपोच किराणा सामान, सामुदायिक विवाह सोहळ्यातून लावलेले ३१ गरीब मुलींचे निकाह, सर्वसामान्यांसाठी अल्पदरात रुग्णवाहिका, पाणपोई यांसारख्या सामाजिक कामातून तरुणांनी एक आदर्श निर्माण केला आहे.

समाजात जगताना आपणही समाजाचे देणे लागतो, या भावनेतून शहरातील आठ मुस्लिम तरुण एकत्र आले. समाजकार्य करण्यासाठी जानेवारी २०१४ मध्ये त्यांनी अल फलाह कमिटी स्थापन केली. सुरवातीला रस्त्यावर भीक मागून मिळणाऱ्या पैशातून पोटाची आग शमविणाऱ्या निराधारांना आधार देण्याचे काम केले. कुठलीही जात, धर्म न पाहता गरजवंत ६० निराधार कुटुंबांना प्रत्येक महिन्याला सातशे रुपयांचा किराणा घरपोच देण्याचे काम सुरू केले. यात साखर, चहापत्ती, शेंगदाणे, गोडतेल, खोबरेल तेल, पोहे, मसूर, मूग, तूर या डाळी, साबण आदी वस्तूंचा समावेश आहे. या कामातून आत्मिक समाधान मिळत असल्याने त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यातून मुस्लिम समाजातील गरीब मुलींचा निकाह लावण्यास सुरवात केली. 

चार वर्षांत त्यांनी ३१ मुलींचे लग्न लावले आहेत. शहरात एकही रुग्णवाहिका नसताना अल फलाह कमिटीने सर्वसामान्य रुग्णांसाठी ना नफा, ना तोटा तत्त्वावर रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.

उन्हाळ्या, सार्वजनिक कार्यक्रमात पाणपोई सुरू करून अनेकांची तहान भागवत आहेत. दिवसभर स्वतःचा व्यवसाय करून सर्व तरुण या कार्यासाठी वेळ देतात. समाजातील नागरिकांचा या कार्यासाठी हातभार लागावा यासाठी शहरातील काही दुकानांत त्यांनी दानपेट्या ठेवल्या आहेत. यातून मिळणाऱ्या वर्गणीतून हे कार्य मागील चार वर्षांपासून सुरू आहे. मुस्लिम तरुणांनी सुरू केलेला उपक्रम आदर्श ठरला आहे.

समाजकार्याचा वसा घेतलेले तरुण
शेख इनायत, शेख अली, शेख हमीद, शेख वाजेद, शेख मुस्ताक, शेख इम्रान, राजू खान, मोबीन आतार, शफिक आतार.

आम्ही सुरू केलेल्या समाजकार्यासाठी अनेकांचे मदतीचे हात पुढे येत आहेत. यापुढे सर्वांच्या मदतीने गोरगरीब रुग्णांच्या औषधोपचारासाठी मदत करण्याचा विचार आहे.
- शेख इनायत, अध्यक्ष, अल फलाह कमिटी.

Web Title: positive story Muslim youth took the responsibility of social work through the Al Falah Committee