गोंडी टू बंगाली व्हाया मराठी

गोविंद हटवार 
रविवार, 20 मे 2018

नागपूर - दहावी-बारावीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अशी ही स्टोरी आहे. दहावी नापास झाल्यानंतर पेटून उठून अभ्यासाला लागलेला विजय गेडाम हा विद्यार्थी आता शिक्षक आहे. त्याने गोंडी, बंगाली भाषांवर प्रभुत्व मिळविले आहे. 

नागपूर - दहावी-बारावीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अशी ही स्टोरी आहे. दहावी नापास झाल्यानंतर पेटून उठून अभ्यासाला लागलेला विजय गेडाम हा विद्यार्थी आता शिक्षक आहे. त्याने गोंडी, बंगाली भाषांवर प्रभुत्व मिळविले आहे. 

वडिलांचे मूळ गाव वर्धा जिल्ह्यातील बोर धरणाच्या कुशीत लपलेलं पेंढरी. मनपात नोकरीनिमित्त ते नागपुरात आले. चार भावंडांचा शिक्षणाचा खर्च भागविणे कठीण होते. दहावीत शिकवणी लावता आली नाही, याचे शल्य होते. विजय दहावीत २००५ मध्ये नापास झाला. आई इंदूताईने धिर दिला. त्यानंतर चारूताई सोमकुवर यांचे मार्गदर्शन लाभले. डी. एडची पूर्ण शुल्क अमिताभ पावडे यांनी भरले. त्यामुळे विजयने उच्च शिक्षण घेण्याचा चंग बांधला. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तकिया, फकिरावाडी या झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना मोफत शिकविले. तो सिलसिला अजूनही सुरू आहे. गोंडी भाषा लुप्त होत आहे. समाजाचा घटक म्हणून त्या भाषेला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विजय गेडाम यांनी सांगितले.  

बंगालीत मध्यमा 
विजयने २००९ पासून बंगाली भाषा शिकायला सुरुवात केली. २०११ मध्ये राष्ट्रीय स्तरावर दुसरे पारितोषिक पटकावले. बंगाली भाषेतील संवाद मराठी भाषेत भाषांतरित करतो. संगीताची आवड असल्याने मराठी, बंगाली, कानडी भाषांमध्ये गायन करतो.   

डी.एड.मध्ये ८२ टक्के गुण प्राप्त झाले. बी.एड.मध्ये सुवर्णपदक खेचून आणले. इतिहासात एम.ए. सुरू आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. शिवाय, गोंडी भाषेच्या लिपीचा प्रचार-प्रसार करायचे आहे. 
-विजय गेडाम,शिक्षक, नाईट स्कूल, धंतोली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: positive story vijay gedam story bengali language