अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून येणारा देवदूत 

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून येणारा देवदूत 

जळगाव - एखाद्या ठिकाणी अपघात झाला की, अपघातग्रस्तांची मदत न करता त्यांचे फोटो काढत असल्याने अनेकांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागला असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत; परंतु अपघात झाल्याचे समजताच हातातील काम सोडून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारा देवदूत म्हणून राजेंद्र भाटिया यांची अशी ओळख निर्माण झाली आहे. आतापर्यंत त्यांनी हजारपेक्षा अधिक अपघातग्रस्तांना जीवनदान दिल्याने मदतीसाठी धावून येणारा "देवदूत' अशी त्यांची सर्वत्र ओळख आहे. 

निमगव्हाण (ता. चोपडा) या छोट्याशा गावातील राजेंद्र कस्तुरचंड भाटिया हे शेती करून आपला उदरनिर्वाह चालवितात. आपण समाजाचे काही देणे लागतो, "सेवाभाव परमो धर्म' या उक्तीनुसार अडीअडचणीत किंवा अपघातग्रस्तांना मदतीचा हात द्यावा, या आईवडिलांच्या शिकवणीतून राजेंद्र भाटिया वयाच्या 19 वर्षांपासून आजतागायत अपघातग्रस्तांची मदत करीत आहेत. चोपडा, अडावद यासह आजूबाजूच्या गावांमध्ये अपघात झाल्याचे कळताच राजेंद्र भाटिया हे आपल्या हातातील काम सोडून त्या अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी जातात. आतापर्यंत राजेंद्र भाटिया यांनी अपघातात जखमी झालेल्यांना तत्काळ उपचारासाठी दाखल केल्यामुळे हजारपेक्षा अधिक अपघातग्रस्तांना जीवदान मिळाल्याने त्यांच्यासाठी ते देवदूतच ठरले आहेत. 

स्वखर्चाने रुग्णावर उपचार 
चोपड्यासह आजूबाजूच्या गावांमध्ये अपघात किंवा कोणतीही घटना घडल्याचे समजताच क्षणाचाही विलंब न करता राजेंद्र भाटिया हे त्यांच्या मदतीसाठी धावून त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करतात. अनेकदा काही रुग्णांना उपचारार्थ खासगी रुग्णालयातदेखील दाखल केले असून रुग्णांच्या नातेवाइकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यास त्यांनी गावकऱ्यांसह मित्रमंडळींच्या मदतीने रुग्णालयाचा खर्चदेखील केलेला आहे. 

पूर्वी अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्याची पोलिसांकडून चौकशी केली जायची; परंतु नागरिकांनी आपल्या मनातील ही भीती दूर करून अपघातग्रस्ताचे फोटो काढत बसण्यापेक्षा त्याला तत्काळ रुग्णालयात पोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. त्या वेळी जातीधर्माचा विचार न करता माणुसकीचा धर्म पाळावा. 
-राजेंद्र भाटिया 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com