आयुष्यात संकटे आली; पण हार नाही मानली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

माणसाच्या जीवनात संकटे येतच राहतात. त्यामुळे खचून न जाता त्यातून मार्ग काढत पुढे जायचे असते. नोकरी सुटली, नियतीने तीन मुले हिरावून घेतली. तरीही मी खचलो नाही आणि हिंमत पण हरलो नाही. ‘बुडत्याला काडीचा आधार’ या उक्तीप्रमाणे वृत्तपत्रविक्री व्यवसायामुळे मला जगण्याचे बळ मिळाले.
- रामचंद्र साठे, वृत्तपत्रविक्रेता

रामवाडी - छोट्या-मोठ्या संकटाने हतबल होणारी माणसे समाजात आपण पाहतो. परंतु, अनेक संकटांवर जिद्दीने मात करीत जीवनाची वाटचाल करणाऱ्यांपुढे परिस्थितीही हतबल होते, अशीही उदाहरणे सभोवताली पाहण्यास मिळतात. गरिबीचे चटके सहन करीत असतानाच नोकरी सुटलेली, त्यातच नियतीने हाताशी आलेली तीनही तरुण मुले हिरावून घेतलेली. त्यातून स्वतःला व पत्नीला दुःखातून सावरत रामवाडी येथील रामचंद्र संभाजी साठे यांचा जिद्दीचा प्रवास पाहिला, तर परिस्थितीलाही गुडघे टेकायला लावण्याचे त्यांचे मनोबल नव्या पिढीसाठी निश्‍चितच आदर्शवत आहे.

साठे यांचा पेपरविक्रीचा व्यवसाय. १९७२ साली वडगाव शेरी परिसरात पेपरविक्री केंद्र नसल्याने भल्या पहाटे साठे यांना रामवाडीवरून साडेतीन वाजता सायकलवरून शहरात यावे लागे. प्रत्येक ठिकाणच्या कार्यालयामधून विविध वृत्तपत्रांचा पाचशेचा गठ्ठा विक्रीसाठी घेऊन पहाटे साडेपाचपर्यंत घर गाठावे लागे.

त्यानंतर जवळपास सात ते आठ ठिकाणच्या लाइनमध्ये घरोघरी पेपर टाकून झाल्यावर एका खासगी कंपनीत सकाळी आठ वाजता पोहचायचे. सुरवातीला कंपनीत साडेतीन रुपये पगार होता. पुढे वाढत जाऊन नऊशे रुपयांपर्यंत पोहचला आणि १९९२ साली कंपनीच बंद पडली. आर्थिक विवंचनेमुळे खचून न जाता त्यांनी परिस्थितीवर मात करण्याचे ठरविले.

अशावेळी पेपरविक्री हाच एकमेव आधार होता. चार मुलांचे शिक्षण, कपडालत्ता, दवाखाना, घरखर्च सर्वकाही यावरच अवलंबून होते. १४ फेब्रुवारी २००६ मध्ये पंचवीस वर्षांची तरुण मुलगी आजारात गेली. तिच्या दु:खातून सावरत असतानाच २३ जून २००६ रोजी आणखी एक दुखःचा आघात साठे कुटुंबावर झाला. २१ वर्षांचा मुलगा व २३ वर्षांच्या मुलीचे अपघातात निधन झाले. अशाही परिस्थितीत खचून न जाता स्वतःला व पत्नीला दुःखातून सावरले.

आलेल्या अनेक संकटांवर ते मात करीत जीवन जगत आहेच. आता थकलेल्या शरीराने पेपर टाकण्याची लाइन बंद केली असली, तरी पेपर स्टॉलवर  आजही विविध वृत्तपत्रांची विक्री करून उदरनिर्वाह ते करतात. लहान-सहान घटनांनी नैराश्‍यात जाणाऱ्या नव्या पिढीला साठे यांचा जीवनप्रवास निश्‍चितच प्रेरणादायी ठरू शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramchandra Sathe Paper Sailing Life Success Motivation