ग्रामीण भागातील सावित्रीच्या लेकींची झेप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

परिस्थितीवर मात - कष्टमय जगण्यातूनही बारावीत उत्तम यश

रत्नागिरी - घरची बेताची आर्थिक परिस्थिती, ग्रामीण भागातून दररोजचा प्रवास आणि घरी काम करून बारावीच्या परीक्षेत दक्षता सुरेश लोगडे व मैथिली सुधीर पिलणकर यांनी निर्भेळ यश मिळवले. अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात एमसीव्हीसी शाखेत या दोघींनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. अकौंटिंग अँड फायनान्समध्ये पुढील शिक्षण घेण्याचा मानस या दोघींनी व्यक्त केला. पहिली आलेली मानसी रामाणेसारखीच या दोघींचीही कथा, जिद्द आणि यश आहे.

बसणी-भोवारीवाडी येथील मैथिली पिलणकर हिने ८४.७७ टक्के गुण मिळवत एमसीव्हीसी शाखेत तिसरा क्रमांक पटकावला. अकौंटिंग अँड फायनान्समध्ये तिला सर्वाधिक ९९ गुण मिळाले आहे. तिचे वडील वर्षभर मोलमजुरी करतात व झाप विणून चरितार्थ चालवतात. या झाप विणण्याच्या कामात मैथिली व कुटुंबीय हातभार लावतात. पावसाळ्यात नौका शाकारणीसाठी या झापांचा उपयोग केला जातो. एका झापाला वीस रुपये मिळतात. यातून फार पैसे मिळत नाहीत, परंतु मामा दीपक नागवेकर यांचे प्रोत्साहन व अर्थसाह्य असल्याने शिक्षण घेता आले, असे मैथिली आवर्जून सांगते. दररोज सकाळी घरकामात मदत, झाप विणायचे व अभ्यासही करायचा असा तिचा दिनक्रम. बसणीच्या शेट्ये हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत तिने ८२.६० टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळवला होता.

बसणीमधील दक्षता लोगडे हिने ८६ टक्के मिळवून एमसीव्हीसी शाखेत दुसरा क्रमांक मिळवला. कोणत्याही खासगी शिकवणीशिवाय तिने हे यश मिळवले आहे. सकाळी आईला घरकामात मदत, थोडा अभ्यास व नंतर एसटीने दररोज कॉलेजला यायचे असा तिचा दिनक्रम होता. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करण्याची सवय तिने लावून घेतली. दक्षताची बहिण बीएस्सी झाली असून सध्या स्पर्धा परीक्षांचा सराव करत आहे. त्यामुळे तिचेही विशेष मार्गदर्शन लाभल्याचे दक्षताने सांगितले. दक्षताचे वडिल सुतारकाम करतात व आई गृहिणी आहे. इयत्ता दहावीमध्ये दक्षताला ७७.६० टक्के गुण मिळाले होते व आता आणखी अभ्यास करत ८६ टक्के मिळवले.

अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात प्रा. माधव पालकर, प्रा. सुहास सोहोनी, प्रा. श्रीकांत दुदगीकर आदींचे मार्गदर्शन लाभल्याचे या दोघींनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ratnagiri konkan news success in hsc exam