निराधार कुटुंबाची जबाबदारी गावाची

Uttam-Kurandale
Uttam-Kurandale

शिरूर - पत्नी आणि मुलाबाळांचा त्याचा संसार. आचारी म्हणून काम करून कुटुंबाचा चांगला उदरनिर्वाह चाललेला. पण या सुखी संसाराला दृष्ट लागावी तसे झाले. कर्ता माणूसच हृदयविकाराने गेला आणि अवघे कुटुंब उघड्यावर आले. पण गाव एक झाला आणि त्यांनी ‘या कुटुंबाची जबाबदारी आता गावाची’, असा निर्धार करून तब्बल ११ लाख रुपयांचा निधी गोळा केला आणि या कुटुंबाला सावरले.

अण्णापूर (ता. शिरूर) गावाने हा आदर्श घालून दिला. गावातील उत्तम विष्णू कुरंदळे (वय ४८) यांचे २३ फेब्रुवारीला ह्रदयविकाराने निधन झाले. 

कुरंदळे हे आचारी कामातून आणि वडापावच्या छोट्याशा दुकानावर कष्टाने व जिद्दीने उदरनिर्वाह करीत होते. मोठी मुलगी अश्‍विनी नर्सिंगचा कोर्स करते, दमयंती तेरावीला; तर कुणाल दहावीत शिकत आहे. 

संसाराचा गाडा चांगला चालला असताना, उत्तम कुरंदळे यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि दवाखान्यात नेईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. या आघाताने त्यांचे कुटुंब खचले. पण गावातील ज्येष्ठांनी, तरुणांनी सातत्याने भेटून दिलासा दिला. एकीकडे कुटुंबाची मानसिक स्थिती खंबीर करताना, भविष्यात या कुटुंबाला सावरण्यासाठी काय करता येईल याचेही नियोजन केले. 

कुरंदळे यांना पैसा जमविता आला नाही; पण त्यांनी माणुसकी मोठी जमवली होती. गोरगरिबांच्या लग्नकार्यात अल्प मोबदल्यात;  तर प्रसंगी विनामूल्य देखील त्यांनी कामे केली. याची जाणीव ठेवून गावाने त्यांच्या कुटुंबाला या संकटातून पुन्हा उभे करण्याचा निर्धार केला. त्यातून स्वेच्छेने निधी संकलन करण्यात आला. 

ग्रामस्थांबरोबरच; उत्तम कुरंदळे यांचे नातेवाईक, मित्र व हितचिंतकांनी यामध्ये आपापल्या परीने योगदान दिले. पन्नास ते पाच हजारांपर्यंत रक्कम जमा केली. त्यातून जमा झालेले अकरा लाख रुपये कुरंदळे यांच्या पत्नी अनिता व मुलांकडे सुपूर्त करण्यात आले.

...असे आले पुढे मदतीचे हात
  आमदार बाबूराव पाचर्णे यांनी उत्तम कुरंदळे यांच्या पत्नी व मुलांची भेट घेऊन सांत्वन केले. मुलांनी शिक्षण अर्धवट सोडू नये, असे आवाहन करतानाच त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. तसेच एक लाख रुपयांची मदतही दिली. 

  शिरूरमधील ‘श्री गणेशा हॉस्पिटल’चे डॉ. अखिलेश राजूरकर यांनी कुरंदळे कुटुंबीयांची भेट घेऊन, विनामूल्य वैद्यकीय उपचार केले जातील, असे सांगितले. 

  आजी-माजी सैनिक, पोलिस संघटना यांनीही मोठे योगदान दिले. शालेय विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशांतून दोन हजार रुपये जमविले. 

  शेतमजूर महिलांनीही आपल्या परीने निधी जमवून कुरंदळे कुटुंबीयांकडे दिला. 

  कुरंदळे यांच्या घराचे काम करणारे धनंजय झेंडे यांनी मजुरीचे लाखभर रुपये घेणार नसल्याचे स्पष्ट केले. 

  दशक्रिया विधीला प्रवचन, पिंडदान विधी, त्यासाठीचा ध्वनिवर्धक, मुंडणविधी याचेही संबंधितांनी पैसे घेतले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com