रोहन बनला कोकणातील पहिला फ्लाईंग ऑफिसर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

दापोलीचा सुपुत्र - किशोर वयात घेतलेला ध्यास पूर्णत्वास

दापोलीचा सुपुत्र - किशोर वयात घेतलेला ध्यास पूर्णत्वास

दापोली - हवाई दलात सामील होण्याचा ध्यास रोहन पवारने घेतला होता. किशोर वयातच रोहनने त्याचे सुभेदार असलेल्या आजोबांच्या छायाचित्रासोबत इंडियन एअरफोर्सच्या विमानाचे पोस्टर लावले होते. हा ध्यास आज त्याने पूर्ण केला. रोहन कोकणातील वायुदलातील पहिला फ्लाईंग ऑफिसर बनला आहे. अजून दीड वर्षाच्या प्रशिक्षणानंतर त्याला ‘मिराज’सारखी लढाऊ विमानेही उडवण्यास मिळणार आहेत. रोहनने १७ डिसेंबरला हैदराबाद येथील भारतीय वायुदलाच्या प्रशिक्षण केंद्रात झालेल्या परेडमध्ये हा सन्मान मिळवला. रोहनचे वडील रतन पवार हे दापोली आगारात वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यरत असून आई राजश्री पवार या गृहिणी आहेत. मोठा भाऊ पुणे येथे गणितात पीएचडी करीत आहे.खेड तालुक्‍यातील चिंचवली हे त्याचे मूळ गाव. दापोली येथे बालपण गेले.

बालपणी पाहिलेले विमान उडविण्याचे स्वप्न रोहनने ध्येय, जिद्द, आवड, खडतर मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पूर्ण केले. शिशुवर्गापासून दहावीपर्यंत दापोलीत एजी हायस्कूलमध्ये त्याचे शिक्षण झाले. दहावीमध्ये असताना लाडघर दत्तमंदिर येथे आयोजित पोलिस अधिकारी धनराज वंजारी व एअर फोर्समधील अधिकाऱ्यांच्या व्याख्यानाने त्याच्या मनावर पायलट व्हायचे हे कोरले.

खेड तालुक्‍यातील पवार कुटुंबीय गृह विभागात नोकरी करणारे म्हणून प्रसिद्ध आहे. रोहनचे आजोबा, काका पोलिस सेवेत होते. आईचे वडील रघुनाथ मोरे भारतीय लष्करात सुभेदार म्हणून निवृत्त झाले. रोहन पुण्यात पुढील शिक्षणासाठी गेला तेव्हा कोपरगावामध्ये एनडीएचे प्रशिक्षण घेतले; मात्र मुलाखतीमध्ये त्याला अपयश आले. या कालावधीत एअरफोर्सच्या एनसीसीच्या कॅम्पमध्ये तो दाखल झाला. त्याने जिद्द  कायम ठेवली.

फर्ग्युसन कॉलेजमधून बीएस्सी पूर्ण केले. २०१३ ला रोहन भारतीय सैन्यदलात दाखल झाला. सलग नऊ महिने प्रशिक्षण घेतले. यादरम्यानच त्याला हवाई दलातील संधी चालून आली. लष्करातील प्रशिक्षण पूर्ण झाले,

मात्र तरीही ते सोडून तो वायुदलात सामील झाला. त्यासाठी सर्व्हिस सिलेक्‍शन बोर्डमध्ये सहा दिवसांची मुलाखत त्याने दिली. यावेळी मात्र त्याने बाजी मारली. त्यानंतर बेंगलोर येथील फ्लाईंग ब्रॅंचमध्ये दीड वर्षे प्रशिक्षण पूर्ण केले. सुरवातीचे सहा महिने मैदानी प्रशिक्षण होते. त्यानंतर पिलॅटस्‌ पीसी ७- मार्क २ या विमानांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर फ्लाय टास्कमध्ये भरती होऊन एमके १ सारख्या लढाऊ विमानांचे प्रशिक्षणही त्याने घेतले. बेसिक जेट ट्रेनिंग पूर्ण झाले आहे, अशी माहिती त्याने दिली.

पुढील प्रशिक्षण हॉक विमानांचे असून ते बिदर येथे होईल. त्यानंतर बंगालमधील कलाइकोंडा येथे बॉम्बिंग ट्रेनिंग होणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण होताच वायुदलाच्या सेवेत मिराज, सुखोईसारखी भारतीय वायुदलातील लढाऊ विमाने चालविण्याचा मानस रोहनने व्यक्त केला.

या सर्व प्रक्रियेदरम्यान इच्छा असूनही आम्हाला त्याच्यासोबत परगावी जाता आले नाही; मात्र त्याने याचा कोणताही बाऊ न करता भारतीय वायुदलात जाण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण केली, याचा आम्हाला अभिमान वाटतो.
 - राजश्री पवार, रोहनच्या आई

Web Title: rohan pawar flying officer