दहा वर्षांनंतर फुलू लागली गुलाब बाग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

औरंगाबाद - महापालिकेतर्फे दरवर्षी शेकडो घोषणा केल्या जातात. त्यातील अनेक घोषणांची पूर्तताच होत नाही. त्यामुळे नागरिकांचा महापालिकेवरील विश्‍वास उडत आहे; मात्र मजनू हिल येथे दहा वर्षांनंतर का होईना गुलाबी फुले फुलली आहेत. वर्ष २००७ मध्ये घोषणा केलेले रोज गार्डन २०१८ मध्ये प्रत्यक्षात अवतरले आहे.

औरंगाबाद - महापालिकेतर्फे दरवर्षी शेकडो घोषणा केल्या जातात. त्यातील अनेक घोषणांची पूर्तताच होत नाही. त्यामुळे नागरिकांचा महापालिकेवरील विश्‍वास उडत आहे; मात्र मजनू हिल येथे दहा वर्षांनंतर का होईना गुलाबी फुले फुलली आहेत. वर्ष २००७ मध्ये घोषणा केलेले रोज गार्डन २०१८ मध्ये प्रत्यक्षात अवतरले आहे.

शहरात रोझ गार्डन उभारण्याचा निर्णय दहा वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. उटी महापालिकेने विकसित केलेल्या रोझ गार्डनला दरवर्षी लाखो पर्यटक भेटी देतात. औरंगाबादमध्ये देखील देश-विदेशांतून हजारो पर्यटक येतात. त्यांना आकर्षित करण्यासाठी मजनू हिल येथे रोझ गार्डन विकसित करण्यात करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर किमान दहा आयुक्त होऊन गेले; मात्र हे गार्डन विकसित झाले नाही. तत्कालीन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी या कामाला चालना दिली; मात्र नंतर निधीअभावी हे काम रखडले. दरम्यान, विद्यमान आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी कामाची जबाबदारी उपायुक्त वसंत निकम यांच्याकडे सोपविली आहे. आठ दिवसांपूर्वी या ठिकाणी 200 गुलाबाची झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांना आता रोझ गार्डन पाहायला मिळणार आहे.

अशी होती संकल्पना
तत्कालीन आयुक्त असीमकुमार गुप्ता हे उटी दौऱ्यावर गेले होते. तेथील रोझ गार्डन त्यांना आवडले. त्यांनी महापालिका पदाधिकाऱ्यांना उटी दौऱ्यावर पाठवून रोझ गार्डन उभारण्याच्या प्रस्तावाला मूर्त स्वरूप दिले. सुरवातीला निविदेत नऊ वर्षांसाठी उद्यान देण्याची अट होती. नंतर नर्सरी चालकांनी १५ वर्षांची मागणी केली. त्यानंतर ३५ वर्षांची अट समोर आली. ही अट मान्य होणार नाही, असे सांगत निविदा रद्द करण्यात आली. 

पुन्हा मुहूर्त हुकला 
आठ डिसेंबरला रोझ गार्डन नागरिकांसाठी खुले करण्याचे आयुक्तांनी जाहीर केले होते; मात्र अद्यापपर्यंत उद्यान खुले करण्यात आलेले नाही.

पर्यटन विभागाकडून चार कोटींची घोषणा 
केंद्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून या उद्यानासाठी चार कोटींचा निधी मंजूर झाला होता; मात्र निधी मिळण्यास विलंब झाल्याने काम रखडले होते. विविध एक हजार जातीची गुलाब फुले लावून या ठिकाणी रोपवाटिका तयार केल्यानंतर ती बीओटी तत्त्वावर चालविण्यास देण्याचा महापालिकेचा विचार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rose Garden Success Motivation