भावापाठोपाठ बहिणीला वर्दीचा मान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

पुणे - शेतात राबत संसाराचा गाडा हाकणाऱ्या आई-वडिलांचे पांग फेडण्यासाठी जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश मिळवत भावापाठोपाठ बहिणीनेही खाकी वर्दीचा मान पटकावला. लेकीचे हे यश पाहून आई-वडिलांचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले.

रूपाली मधुकर काळे असे या लेकीचे नाव. तिने २०१६ मध्ये फौजदार पदासाठीची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात ती १५३ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. ही परीक्षा ७५० जागांसाठी घेण्यात आली होती. त्यात १७६ मुलींनी ही परीक्षा दिली.

रूपालीचे वडील मधुकर काळे हे शेतकरी. हे कुटुंब मूळचे पुरंदर तालुक्‍यातील भिवडीचे. सध्या ते पुण्यात भेकराईनगरला स्थायिक झाले आहे. मधुकर आणि त्यांची पत्नी नंदा यांनी शेतीत कष्ट करून मुलगी आणि मुलाचे शिक्षण पूर्ण केले. २०१५ मध्ये मुलगा राहुल लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन फौजदार झाला. परंतु या नोकरीत रस नसल्याने त्याने राज्य सेवेची परीक्षा दिली व त्यातून तो मंत्रालयात रुजू झाला. भावाचे यश पाहून रूपालीनेही लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे ठरविले. सासवड येथील वाघिरे महाविद्यालयातून बी.ए. झाल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. नुकतेच उपविभागीय पोलिस अधिकारी पदावरून निवृत्त झालेले चुलते दत्तात्रेय काळे यांचे तिला मार्गदर्शन लाभले. 

रूपालीने भिवडी गावातील पहिली महिला अधिकारी होण्याचा मान मिळविला आहे. तिच्या या यशाचा गावाला अभिमान आहे, अशा शब्दांत सरपंच उषा मोकाशी यांनी तिचे कौतुक केले. 

आम्हा बहीण-भावासाठी आयुष्यभर शेतात राबलेल्या आई-वडिलांच्या कष्टाला मी न्याय देऊ शकले. हे यश माझे असले तरी त्यामागची प्रेरणा त्यांचीच आहे. माझ्यासारख्या कुटुंबातील मुलामुलींनी हार न मानता जिद्दीने अभ्यास केला तर यश अवघड नाही.
- रूपाली काळे, फौजदार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rupali kale PSI Success Motivation