
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह लाखो मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड, किल्ल्यावरील अवशेषांची पडझड सुरू झालीय.
महाराजांसाठी कायपण! वसंतगडासाठी 24 तासात जमवली 'लाखमोला'ची मदत
कऱ्हाड (सातारा) : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले वसंतगड (Fort Vasantgad) येथील पडझड झालेल्या बुरूजांच्या बांधकामासाठी आवश्यक असलेला पाच लाखांचा निधी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या (Sahyadri Pratishthan Hindustan) दुर्गसेवकांनी अवघ्या 24 तासात जमा केला. सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत राज्यभरातील दुर्गसेवकांनी दुर्ग संवर्धनासाठी हा अनोखा उपक्रम राबवला.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह लाखो मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड, किल्ल्यावरील अवशेषांची मागील काही वर्षांपासून पडझड सुरू झाली आहे. गडकोटांना पुनर्वैभव प्राप्त करून देत दुर्ग संवर्धन ही व्यापक चळवळ व्हावी, यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यभरातील गडकोटांवर संवर्धनाचे कार्य करणार्या सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गोजमगुंडे सहकारी दुर्गसेवकांसह किल्ले वसंतगड येथील पडझड झालेल्या बुरूंजाच्या पुनर्बांधणीसाठी राज्य पुरातत्व खात्याकडे पाठपुरावा करत होते.
या पाठपुराव्यास यश येऊन जून महिन्यात किल्ले वसंतगड येथील बुरूजांची पुनर्उभारणी करण्यास मान्यताही मिळाली आहे. गोजमगुंडे यांनी सह्याद्रीच्या दुर्गसेवकांना किल्ले वसंतगडसाठी साद घातली होती. केवळ २४ तासांतच पाच लाखांचा निधी जमा झाला आहे. त्यामुळे किल्ले वसंतगडावरील पडझड झालेल्या बुरूंजाच्या पुनर्बांधणीचा मार्ग सुकर झाला आहे.
आता प्रतापगडावर लक्ष
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह मावळ्यांच्या पराक्रमाचे जिवंत स्मारक म्हणून किल्ले प्रतापगडची ओळख आहे. प्रतापगडवरील ऐतिहासिक चिलखती बुरूजांची पडझड झाली आहे. सह्याद्री प्रतिष्ठानानने या बुरूंजाची पुनर्उभारणीचे काम हाती घेत निधी संकलन सुरू केले आहे.