परिस्थितीवर मात करत धरली "प्रकाश'ची वाट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

आईने शाळेत घातले; पण प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेण्याची जबाबदारी माझी होती. प्रतिकूल परिस्थिती बदलेल, असा मला विश्‍वास होता. प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचे फळ मिळाले. 
-संदीप बडेकर 

पुणे - वस्तीतील छोटे घर, तेथील गोंगाट, व्यसनांचा विळखा, सततची भांडणे, अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नाना पेठेतील मंजुळाबाई चाळीत राहणारा संदीप बडेकर शिकत गेला. कधी उन्हाळ्याच्या सुटीत, तर कधी शाळा, महाविद्यालयाची वेळ सांभाळून मिळेल ते काम करून तो स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवीत होता. त्यानंतर हळूहळू एका हॉटेलमध्ये संदीप "डीजे' म्हणून काम करू लागला. पुढे काही चांगल्या लोकांचे मार्गदर्शन व संगतीमुळे त्याने बॅंकेचे कर्ज घेऊन स्वतःचा "लाइट ऍण्ड साउंड'चा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी त्याने खास चीनची वारीही केली. आता चार "डीजे' आणि चार तरुणांना रोजगार देणारा संदीप आता व्यावसायिक झाला आहे. 

नाना पेठेतील सध्याच्या मंजुळाबाई चाळीतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) इमारतीत संदीप आपली आई, कल्पना बडेकर, वडील नंदू बडेकर व छोट्या भावासह राहत आहे. मूळचे उरुळी कांचन येथील असलेले संदीपचे कुटुंब खूप वर्षांपूर्वी रोजगारासाठी पुण्यात आले. मंजुळाबाई चाळीतील छोट्या झोपडीत हे चार जणांचे कुटुंब राहत होते. वडील व्यसनी, तर आई घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत. नववीपर्यंत शिकलेल्या आईने संदीपला शाळेत घालण्याची जबाबदारी पार पाडली. प्रतिकूल परिस्थितीत त्याने नववीपर्यंत शिक्षण घेतले. दहावीच्या परीक्षेचे शुल्क भरण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते. तेव्हा त्याच्या शिक्षिका कुंटे यांनी ते पैसे भरले. त्यानंतर संदीपने मागे कधी पाहिलेच नाही. त्याने वाडिया महाविद्यालयातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. 

शिक्षण घेतानाच संदीप एका हॉटेलमध्ये संध्याकाळी "डीजे' म्हणून काम करत होता, तर सकाळी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद अहिरे यांच्याकडे काम करत होता. एकदा अहिरे यांनी संदीपला स्वत:चा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. तसेच त्याला "लाइट ऍण्ड साउंड'च्या व्यवसायाचे मार्गदर्शन केले व बॅंकेतून दहा लाखांचे कर्जही मिळवून दिले. या वस्तू आणण्यासाठी चीनचा दौरा करण्यासही त्यांनी त्याला मदत केली. संदीपनेही व्यवसायात स्थिर झाल्यावर अवघ्या 18 महिन्यांतच कर्जही फेडले. सध्या पुणे शहर व जिल्ह्यातील कुठलाही उत्सव, सण, समारंभाला संदीप "लाइट ऍण्ड साउंड'ची व्यवस्था पुरवितो. यातून त्याने काही तरुणांना रोजगारही दिला आहे. त्याचा व्यवसाय दिवसेंदिवस विस्तारत असून, त्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही भर दिला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sandeep badkekar inspiration story