घरकाम करणाऱ्या आईच्या मुलाची रुपेरी पडद्यावर भरारी

sandeep kharat
sandeep kharat

पुणे- घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही एका मुलाने चित्रपटनिर्मितीचे स्वप्न पाहिले. मात्र, ऐन तारुण्यात पदार्पण करीत असतानाच त्याचे वडील घर सोडून गेले. जीवनाचा गाडा हाकण्यासाठी मग त्याच्या आईने दुसऱ्यांच्या घरची धुणी-भांडी केली. अत्यंत काबाडकष्ट करून तिने आपल्या तिन्ही मुलांना शिकवले. त्यापैकी एकाने मोठ्या मेहनतीने अन्‌ जिद्दीने आपले चित्रपटनिर्मितीचे स्वप्न पूर्ण केले. त्या तरुण निर्माता, दिग्दर्शक आणि लेखकाचे नाव आहे डी. संदीप अर्थात संदीप दत्तात्रय खरात. संदीपचा महत्त्वाकांक्षी ‘काळ’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. 

पुण्यातील स्वारगेटमधील मार्केट यार्ड परिसरात संदीप लहानाचा मोठा झाला. २००४ मध्ये वडील अचानक घर सोडून गेल्यामुळे तिन्ही मुलांची जबाबदारी त्याची आई विजया यांच्यावर आली. तिने दुसऱ्या घरची धुणी-भांडी करून कसाबसा आपला ढासळता संसार पुढे रेटला. संदीप सगळ्यात मोठा असल्यामुळे त्यानेही गॅरेजमध्ये काम करून आपल्या आईला हातभार लावला. त्यातच बाहेरून परीक्षा देऊन आपले शिक्षणही पूर्ण केले.

पुणे विद्यापीठातून कम्युनिकेशन ॲण्ड स्टडीजचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. शिक्षक समर नखाते यांनी त्याला खूप मदत केली. तिथेच त्याची चित्रपट विषयाची जडणघडण झाली आणि त्यानंतर दिग्दर्शक व लेखक बनण्याचे स्वप्न घेऊन तो मुंबईत आला. सुरुवातीला त्याला संघर्ष करावा लागला. सहायक दिग्दर्शक, प्रॉडक्‍शन मॅनेजर आदी विविध कामे त्याने केली, पण खरा आधार मिळाला तो रमेश सिप्पी यांच्या प्रॉडक्‍शन हाऊसमध्ये. तिथे त्याने तीनेक वर्षे एडिटिंगचे काम केले. नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ पाहिल्यावर मात्र त्याने आपला चित्रपटनिर्मितीचा निर्धार पक्का केला. संदीपने भाऊ प्रवीणसह फ्रेम्स प्रॉडक्‍शनचे हेमंत रूपारेल व रंजित ठाकूर; तसेच नितीन वैद्य प्रॉडक्‍शन व अनुज अडवानी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता भयपट ‘काळ’च्या प्रदर्शनाची त्यांना प्रतीक्षा लागली आहे.

आमच्या आईने आम्हाला काहीही कमी पडू दिले नाही. तिने आमच्यासाठी घेतलेले कष्ट मी पाहिलेले आहेत. तिला लिहिता-वाचता येत नाही; पण ती खंबीरपणे आमच्या पाठीशी उभी राहिली. चित्रपटनिर्मितीसाठी माझ्या भावांचाही पाठिंबा मिळाला. 
- संदीप खरात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com