दुर्गम भागातील १५ शाळांत ‘सारथी’चा आधार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

गेली तीन वर्षे आम्ही ‘सारथी हात मदती’चा उपक्रम राबवत आहे. यासाठी सामाजिक काम करणाऱ्या लोकांकडून आम्हाला आर्थिक सहकार्य मिळाले. त्याबद्दल त्यांचे आभार. यापुढे देखील दरवर्षी आम्ही हा उपक्रम राबवणार आहे.
- गुरुप्रसाद गोसावी, अध्यक्ष, सारथी सामाजिक विकास संस्था

औंध - सिद्धेश्वर कुरोली (ता. खटाव) येथील सारथी सामाजिक विकास संस्थेमार्फत ‘सारथी हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत यावर्षी गगनबावडा, महाबळेश्वर, माण, खटाव, पाटण या सर्व तालुक्‍यांत असणाऱ्या दुर्गम भागातील प्राथमिक आणि माध्यमिक मिळून १५ शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

गेली तीन वर्षे ‘सारथी’ ‘सारथी हात मदतीचा’ हा उपक्रम राबवत आहे. यावषी ‘सारथी’ने १५ शाळांतील मिळून ३९१ विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले. त्यात शालेय बॅग, प्रत्येक विद्यार्थ्यास सहा वह्या, कंपास पेटी व त्यातील साहित्य, तसेच चित्रकला वही, रंगपेटी आदी वस्तूंचा समावेश होता.

कोल्हापूरच्या पाटीलवाडी, महाबळेश्वरातील वारसोली देव, माणमधील सत्रेवाडी, तेलदरा, माणगंगानगर, बोडके, शेरेवाडी, खताळवस्ती, खटावमधील बुधावलेवाडी, नांदोशी, मेघलदरवाडी, आवारवाडी, सिध्देश्‍वर कुरोली आदी गावांतील मिळून १५ शाळांतील एकूण ३९१ विद्यार्थांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. सारथी हात मदतीचा २०१९ या उपक्रमात प्रमुख म्हणून संतोष पाटोळे, नितीन जाधव, गुरुप्रसाद गोसावी यांनी जबाबदारी पार पडली.

आर्थिक मदत 
सारथी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियातून दुर्गम भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करण्यासाठी आर्थिक साह्य करण्याचे आवाहन केलेले होते. त्यानुसार अनेक लोकांनी सारथी सामाजिक विकास संस्थेस सहकार्य करत या उपक्रमात सहभागी होत मोलाचे सहकार्य केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarathi Social Development Organisation Help to Poor Student Book