esakal | ही पहा माणुसकीची झलक; जाणत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी
sakal

बोलून बातमी शोधा

ही पहा माणुसकीची झलक; जाणत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी

आशिषच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. मात्र, तो लगेच भानावर आला. मध्यरात्रीच्या साडेबारा वाजता त्याने त्या मनोरुग्णाला जेवणाची व पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली. ती होती त्यांची पहिली भेट अन्‌ त्यानंतर त्यांचे जुळले नि:शब्द असे नाते.

ही पहा माणुसकीची झलक; जाणत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः मध्यरात्रीची साडेबाराची वेळ... मनोरुग्ण वृद्ध व्यक्ती फूटपाथवर बसलेली... शून्यात चेहरा असूनही त्याच्या चेहऱ्यावरील भुकेची व्याकुळता दिसत होती... तोच तिथे शहरातील एक युवक जातो... त्या मनोरुग्णाला सावरतो... आशिष मधुकर रैनाक असे त्या युवकाचे नाव... आशिषच्या हातात जेवण असते. ते त्या मनोरुग्णाला देतोही अन्‌ घासही भरवतो... भुकेने व्याकूळ झालेला मनोरुग्णही सावरतो... मध्यरात्री मनोरुग्णाला जेवण देऊन आशिषने दाखवलेली माणुसकीची झलक जाणत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी  क्लिक करा

शहरातील शाहू ते दत्त चौक भागात मनोरुग्ण व्यक्ती अनेक वर्षांपासून आहे. व्यापारी, हॉटेलवाले त्याला जेवण देतात. त्यामुळे त्याच्या खाण्याचा प्रश्न मिटला होता. मात्र, लॉकडाउनच्या काळात त्याची सोय अशा अनेक समाजप्रिय लोकांनी केलीही. त्यात आशिष अग्रक्रमावर आहे. दररोज आशिष त्या मनोरुग्णाला घरात केलेले जेवण आणून घालतो आहे. आठवडाभरापूर्वी त्याच मनोरुग्णाला अन्न नव्हते. त्याचे भुकेने मोठे हाल झाले. तोच मनोरुग्ण भुकेने व्याकूळ झाल्याने कोपऱ्यात बसून असायचा. ते आशिष रैनाक याने हेरले अन्‌ त्याचे मन व्याकूळ झाले. कोपऱ्यात शांत बसलेला मनोरुग्ण येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला जेवण देण्यासाठी विनंती करत होता. तेही आशिषच्या डोळ्यासमोरून गेले नव्हते. त्यामुळे व्याकूळ झालेल्या आशिषची त्या मनोरुग्णाला जेवण देण्याची धडपड सुरू झाली. लॉकडाउनच्या अटी शिथिल झाल्यामुळे जो तो आपापल्या विश्वात मग्न होता. लॉकडाउन असल्यापासून आशिष त्या मनोरुग्णाला शोधून जेवण देत होता. अटी शिथिल झाल्यावरही ते काम सुरूच आहे. मनोरुग्णाकडे पाहण्यास कोणालाही वेळ नव्हता. त्याचीही जाणीव आशिषला झाल्याने त्याने त्याच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली होती.

तो त्या मनोरुग्णाला शोधून जेवण देत आहे, असे समजल्यानंतर त्याच्या मित्रांनीही त्याला जेवण उपलब्ध करून दिले. त्यामुळे लॉकडाउनच्या काळातही त्या मनोरुग्णाची जेवणाची व्यवस्था आशिषकडून झाली होती. त्या मनोरुग्णाला चालताही येत नव्हते. त्याला आधार देत आशिषने मानसिक साथही दिली आहे. आशिषने त्या मनोरुग्णाला एक कट्टा दाखवला आहे. दत्त चौकातील त्या कट्ट्यावर मनोरुग्ण रात्रीची जेवणाची वेळ झाली की बसलेला असतो. बऱ्याच दिवसांपासून हा नित्यक्रम सुरूच आहे. 


पहिल्याच दिवशीचे नि:शब्द नाते... 

एका सायंकाळी आशिषने थेट त्या मनोरुग्णाला गाठले. त्याच्या बाजूला तो दोन मिनिटे उभा राहिला. त्यावेळी त्या मनोरुग्णाने खुण करूनच आशिषला काहीतरी खायला आणून दे, अशी विनंती केली. मी इथेच बसतो, असेही त्याने खुण करून सांगितले. त्यावेळी आशिषच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. मात्र, तो लगेच भानावर आला. मध्यरात्रीच्या साडेबारा वाजता त्याने त्या मनोरुग्णाला जेवणाची व पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली. ती होती त्यांची पहिली भेट अन्‌ त्यानंतर त्यांचे जुळले नि:शब्द असे नाते.

सलून दुकानदारांवर जिल्ह्यात नोंदवला गेला पहिला गुन्हा 

कोरोना : महिला आणि मासिक पाळी! 

तुम्ही केस, दाढी, फेशियल करण्यासाठी जात असाल तर हे नक्की वाचा

loading image