#MondayMotivation शाळेच्या पहिल्याच दिवशी साताऱ्यातील डॉक्‍टरांची 11 हजारांची मदत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जून 2020

दै."सकाळ'ने कातकरी वस्तीतील मुलांच्या शिक्षणाचा प्रवास सर्वदूर पोचविला. त्यामुळे समाजाचा या मुलांकडे, शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. अधिकाऱ्यांकडूनही पाठीवर कौतुकाची थाप मिळाली. 

नागठाणे,(जि.सातारा) : नवीन शैक्षणिक वर्षाचे भवितव्य अद्यापि हो-नाहीच्या निर्णयात अडकले आहे. मात्र, शाळांविषयी असणारी समाजाची आस्था तसूभरही कमी नाही. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वीच एका डॉक्‍टरांनी कातकरी वस्तीतील शाळेतील मुलांसाठी 11 हजार रुपयांची मदत केली आहे.
 
तारळे (ता.पाटण) गावाच्या पश्‍चिमेस कातकरी वस्ती आहे. येथील वस्तीतील मुलांसाठी जिल्हा परिषदेने काही वर्षांपूर्वी वस्तीशाळा सुरू केली होती. काही काळानंतर या वस्तीशाळेचे नियमित शाळेत रूपांतर झाले. या शाळेत शैलजा वाकडे या शिक्षिका अगदी आरंभीपासून कार्यरत आहेत. त्यांनी वस्तीतील मुलांच्या संगोपनापासून ते शिक्षणापर्यंतच्या साऱ्या भूमिका हिरीरीने पेलल्या आहेत. सुरवातीला ही शाळा एका पत्र्याच्या शेडमध्ये भरत असे. नंतर सौ. वाकडे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने शालेय इमारतीसाठी जागा संपादन केली. तिथे मोठ्या मेहनतीने नवीन इमारत उभी केली. शाळेचे बाह्यांग आकर्षक बनविले. वैशाली चंदुगडे या सहकारी शिक्षिकेच्या मदतीने शाळेचा दर्जा अन्‌ मुलांची गुणवत्ता उंचाविली. वाकडे यांचा हा यशस्वी प्रवास दै. "सकाळ'च्या' उपक्रमशील शिक्षक या सदरात उलगडण्यात आला होता. "सोशल मीडिया'तूनही याविषयी लिहून आले होते. त्याचीच दखल घेत सातारा येथील डॉ. ए. जी. पाटील यांनी कातकरी वस्तीच्या शाळेस भेट दिली. शालेय परिसर, शिक्षकांचे परिश्रम पाहून ते भारावून गेले. त्यानंतर त्यांनी या शाळेतील मुलांसाठी 11 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. त्यासोबत मुलांना त्यांनी गोष्टींची पुस्तकेही भेट दिली. डॉ. पाटील यांनी आजवर विविध शाळांच्या शैक्षणिक विकासासाठी मोलाचा हातभार लावला आहे. 

सारे श्रेय "सकाळ'ला... 

दै."सकाळ'ने कातकरी वस्तीतील मुलांच्या शिक्षणाचा प्रवास सर्वदूर पोचविला. त्यामुळे समाजाचा या मुलांकडे, शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. अधिकाऱ्यांकडूनही पाठीवर कौतुकाची थाप मिळाली. "सकाळ'मधील प्रसिद्धीमुळेच डॉ. पाटील यांनी या छोट्या शाळेस भेट दिली. मोठी आर्थिक मदत केली, असे सौ.वाकडे यांनी नमूद केले.

खेळाडू, एन.सी.सी, स्काउट गाइडच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारचा महत्वाचा निर्णय

दहावी नंतर करिअर फक्त कसे निवडावे नव्हेतर कसे घडवावे यासाठी जॉईन करा सकाळ आणि दिशा अकॅडमी, वाई आयोजित वेबिनार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Doctor Donated Eleven Thousand Rupees Tarale School