esakal | Video : ती ऐकते स्वतः फुलविलेल्या बागेतील पक्ष्यांची गाणी 
sakal

बोलून बातमी शोधा

Video : ती ऐकते स्वतः फुलविलेल्या बागेतील पक्ष्यांची गाणी 

शास्त्रीय संगीत गायिका सावनी शेंडे-साठ्ये हिने कंपोस्टखताचा वापर करून अंगण व गच्चीवर बागफुलवली आहे.पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉक्‍सपासून तिने पक्ष्यांसाठी घरटीही बनवली आहेत

Video : ती ऐकते स्वतः फुलविलेल्या बागेतील पक्ष्यांची गाणी 

sakal_logo
By
नीला शर्मा

शास्त्रीय संगीत गायिका सावनी शेंडे-साठ्ये हिने कंपोस्ट खताचा वापर करून अंगण व गच्चीवर बाग फुलवली आहे. पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉक्‍सपासून तिने पक्ष्यांसाठी घरटीही बनवली आहेत. रम्य हिरवाईत पक्ष्यांची गाणी ऐकत ती चित्रं काढते. सिरॅमिकच्या कलाकृती घडवते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सावनी शेंडे-साठ्ये हिच्यासारखी शास्त्रीय संगीत गाणारी गायिका तिच्या घरापुढील अंगण तसंच गच्चीवरील बागेतील निसर्गसंगीत ऐकण्यात विलक्षण रमते. स्वयंपाकघरातील सेंद्रिय कचरा व झाडांच्या साचणाऱ्या पाचोळ्याचं खत वापरून सावनीने बाग फुलवली आहे. पॅकिंगसाठी येणाऱ्या बॉक्‍सचं रूपांतर पाखरांसाठीच्या घरट्यात करणं, ही तिची आगळीवेगळी आवड आहे. ती म्हणाली, "वाया जाणाऱ्या काही वस्तूंचा उपयोग करून मी पक्ष्यांसाठी फीडर्स बनवली आहेत. त्यात खाद्य ठेवते. छोटंसं तळं तयार करून त्यात चार रंगांच्या कमलिनी लावल्या आहेत. या तळ्यातील पाणी पक्षी मनसोक्त पितात. दयाळ, ग्रेट टिट, फ्लाय कॅचर, मुनिया, पोपट, सिल्व्हर बिल्स असे विविध पक्षी इथं विहार करतात. सुगरण पक्ष्याची घरटी आमच्या झाडांवर अगदी जवळून बघायला मिळतात. आम्ही गायक जसे एकेक सूर घेऊन बंदिशीचा डोलारा उभा करतो, तशी ही पाखरं काडी-काडी रचत सुबक घरटी उभारतात.' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सावनीने असंही सांगितलं की, या बागेत मला निसर्गाची नवलाई अनुभवायला मिळते. लिंबू, कोथिंबीर, पालक, पुदिना, टोमॅटो, अळू, कांदापात, भेंडी, वांगी, मिरची, दुधीभोपळा, बटाटे यांसारख्या भाज्या आहेत. शेतातून भाजी आणताना मिळणारा आनंद मला या बागेतून भाज्या खुडून स्वयंपाकघरात नेताना होतो. या हिरवाईत रमताना मला चित्रांसाठीच्या कल्पना सुचतात. माझ्या गाण्याशी जसं माझं अगदी खास नातं, तसंच माझ्या या बागेशीही. इथे मला ऊर्जा, सकारात्मकता आणि उत्साह मिळतो.