शेळका-धानोरा गावाने सुरू केली कन्यादान योजना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

ग्रामीण भागात वधुपित्याची आर्थिक ससेहोलपट आम्ही पाहिली आहे. त्यासाठी हा मदतीचा उपक्रम राबवीत आहोत. त्यातून गावात आदर्श पायंडा पाडण्याचा हेतू आहे. प्रत्येक गावात असे उपक्रम सुरू झाल्यास समाजात सेवाभावी चळवळ सुरू होऊन वधुपित्यांना आधार मिळू शकेल.
- अप्पासाहेब शेळके, ग्रामस्थ, शेळका-धानोरा.

उस्मानाबाद -  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेळका-धानोरा (ता. कळंब) येथील गावकऱ्यांनी ‘शिवकन्या कन्यादान’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गावातील कोणत्याही जाती-धर्माच्या वधूपित्याला दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. त्यासाठी गावातील जगदंब प्रतिष्ठान पुढाकार घेणार असून, गावकरीच देणगी देणार आहेत. 

विवाह सोहळ्यात साहित्याची जुळवाजुळव, मानपान, इतर खरेदी, भोजनावळ आदींवर मोठा खर्च होतो. मुलीच्या वडिलांवर खर्चाचा भार अधिकच येतो. वाढत्या महागाईत सामान्यांना हा खर्च परवडणारा नसतो. त्यातच या दुष्काळग्रस्त भागात विवाह समारंभ म्हणजे सामान्यांसाठी मोठी कसरत ठरते. त्यावर मात करण्यासाठी गावागावांत काही योजना सुरू होत आहेत. फुल ना फुलाची पाकळी देऊन का होईना, वधूपित्यावरील खर्चाचा भार कमी करण्याचा प्रयत्न त्यातून होत आहे. खेर्डा येथे कन्यादान योजना सुरू झाल्यानंतर आता शेजारच्या शेळका-धानोरा गावानेही अशीच अभिनव योजना सुरू केली आहे. गावातील कोणत्याही जाती-धर्माच्या मुलीचा विवाह असल्यास तिच्या पित्याला गावकऱ्यांकडून दहा हजार रुपये रोख स्वरूपात दिले जाणार आहेत. गावातील प्रत्येक लग्नाच्यावेळी वीस गावकरी प्रत्येकी ५०० रुपये देणगी देणार आहेत. गावातील सलोखा कायम राखण्याचाही प्रयत्न या योजनेतून होणार आहे. 

ग्रामीण भागात वधुपित्याची आर्थिक ससेहोलपट आम्ही पाहिली आहे. त्यासाठी हा मदतीचा उपक्रम राबवीत आहोत. त्यातून गावात आदर्श पायंडा पाडण्याचा हेतू आहे. प्रत्येक गावात असे उपक्रम सुरू झाल्यास समाजात सेवाभावी चळवळ सुरू होऊन वधुपित्यांना आधार मिळू शकेल.
- अप्पासाहेब शेळके, ग्रामस्थ, शेळका-धानोरा.

Web Title: Shelka Dhanora village started Kanyadan Yojna