भरपावसात श्रमदानातून उभारला पूल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

कोनांबेकरांनी वाहत्या पाण्यात केले १२ तास काम
सोनांबे - प्रशासकीय यंत्रणेने दिलेला नकार. पाठपुरावा करूनही उपयोग नाही. घरात रुग्ण, शाळेत जाण्यासाठी मुलांची धडपड हे चित्र पाहावेनासे झाले. सरपंचासह आदिवासींनी केला निर्धार अन्‌ भरपावसात १२ तासांच्या श्रमदानातून उभा राहिला पूल. ही किमया केली ती, कोनांबेकरांनी... 

कोनांबेकरांनी वाहत्या पाण्यात केले १२ तास काम
सोनांबे - प्रशासकीय यंत्रणेने दिलेला नकार. पाठपुरावा करूनही उपयोग नाही. घरात रुग्ण, शाळेत जाण्यासाठी मुलांची धडपड हे चित्र पाहावेनासे झाले. सरपंचासह आदिवासींनी केला निर्धार अन्‌ भरपावसात १२ तासांच्या श्रमदानातून उभा राहिला पूल. ही किमया केली ती, कोनांबेकरांनी... 

पापळेवाडी या थोर क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मृतिस्थळावरील ३४० लोकसंख्येच्या आदिवासी वस्तीवर जाण्यासाठी आजही पक्का रस्ता नाही. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात देवनदीवरील कच्चा पूल वाहून गेला. त्यानंतर सरपंच संजय डावरे यांनी वर्षभरात तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, आमदार, खासदार, आदिवासी विकासमंत्री या सर्वांकडे पाठपुरावा केला. पण काम मार्गी लागले नाही. यंदाच्या पहिल्याच पावसाळ्यात मळ्यातील मुलांना शाळेत जाणे, रुग्णांना रुग्णालयात नेणे अवघड झाले होते. या वस्तीवरील लोकांना नदीपात्रातील पाण्यातून, जंगलातून प्रवास करावा लागत होता. या वस्तीवर जाण्यासाठी कोनांबे ते पापळेवाडी हा दोन किलोमीटरचा ग्रामीण मार्ग क्रमांक १८८ व कोनांबे ते वाघदरा वस्ती हा अडीच किलोमीटरचा ग्रामीण मार्ग क्रमांक १४० तातडीने दुरुस्ती व मजबुतीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने कोनांबे येथील पापळेवाडी वस्तीवरील रस्त्यावर वाहत्या पाण्यात पूल उभारणी अशक्‍य असल्याचे सांगितले.
प्रशासनाने हात झटकले, तरी कामाची निकड ओळखून सरपंच डावरे यांनी पापळेवाडी वस्तीवरील नागरिकांना बरोबर घेऊन पूल उभारणीचा निर्णय घेतला. आमदार राजाभाऊ वाजे व तहसीलदार नितीन गवळी यांच्या सूचनेवरून बांधकाम विभागाने आठ जुने सिमेंटचे पाइप उपलब्ध करून दिले. वस्तीवरील ग्रामस्थांनी सकाळी नऊला भरपावसात कामाला सुरवात केली. जेसीबीने वाहत्या पाण्यात पाया तयार केला. प्रत्येकी दोन याप्रमाणे चार रांगेत पाइप टाकण्यात आले. कारागिरांनी दगडी बांधबंदिस्ती केला. ट्रॅक्‍टरने मुरमाची भराई केली. रात्री नऊपर्यंत अनेक हातांनी श्रमदान केले. संपत भांगरे, सोनाजी भांगरे, संतोष भांगरे, तुकाराम डावरे, संदीप डावरे, कैलास डावरे, भांगरे परिवारातील अनेक महिला व पुरुष, ग्रामपंचायत पदाधिकारी या कामात सहभागी झाले होते. इच्छा तिथे मार्ग ही म्हण कोनांबेकरांनी आपला मार्ग तयार करून प्रत्यक्षात आणली, याचे सर्वांना कौतुक वाटले.

स्तंभ न बांधिला तेथे कोणी, पेटविली ना वात...
स्वातंत्र्यपूर्व काळात आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे येथील परिसरात आपल्या कुटुंबासह काही काळ वास्तव्यास होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध गनिमीकाव्याने लढा दिला होता. आजही या वस्तीवर क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा दगडी चिरा आहे. याठिकाणी भांगरे परिवाराचे वंशज वास्तव्यास आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sonambe news bridge raised from labor in rain