पतीला अवैध धंद्यांपासून रोखण्यात पत्नीला यश

दीपक कच्छवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

मेहुणबारेच्या कविता महाजन यांनी निर्माण केला महिलांसमोर आदर्श 
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - संसारासाठी कमाई करताना कष्ट करावे लागतात. मात्र, हे कष्ट ‘वैध’ मार्गाचे असतील तर ती चटणी भाकरीही गोड लागते आणि ‘अवैध’ मार्गाने कमाई होत असेल, तर श्रीमंतीही नकोशी वाटते. अशा भावनेतून पतीला वैध व्यवसायाला लावत आणि त्याच्या बरोबरीने काम करीत येथील पती पत्नीने संसारात गोडवा निर्माण केला. शिवाय आर्थिक बाजूही भक्कम केली. उसाची रसवंती व वेफर्स व्यवसाय चालवून हे कुटुंब आता सुखाने संसाराचा चरितार्थ चालवीत आहेत. 

‘उसाचा रस पिणारी माणसे, अन्‌ माणसाचा रस चोरणारे साखर कारखाने, साखरेतून निर्माण होणारा गोडवा अनेकांना सुखद तर काहींना कडू धक्का देतो’, असाच काहीसा प्रकार मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील अनंत सुरेश महाजन यांच्या संदर्भात दिसून येत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी अवैध मार्गाने बैलगाडीने वाळू वाहतूक करून कुटुंबाचा गाडा ओढत होते. मात्र, त्यांच्या पत्नी अनिता महाजन यांना आपला पती करीत असलेला वाळूचा अवैध व्यवसाय हे काम चांगले नाही, असे सांगून बऱ्याचदा त्यांचे वादही व्हायचे. अनिता यांनी मनाशी खूणगाठ बांधली व पतीला या कामापासून रोखले. नवीन उद्योग सुरू करण्याचा विचार दोघांनी केला. कविता महाजन यांनी केळी वेफर्स तयार करून ते विकण्याचा उद्योग करायचे ठरवले. त्यांच्या पतीने त्यांना साथ दिली. दोघांनी धुळे रस्त्यावरील जामदा फाट्यावर चिंचेच्या झाडाखाली जागा तयार केली व हा उद्योग सुरू केला. याला जोड म्हणून रसवंतीही सुरू केली. 

दिवसाला २० किलोची विक्री 
कविता महाजन व त्यांचे पती अनंत महाजन हे दोन्ही केळीपासून वेफर्स तयार करून विकतात. सध्या केळीचे भाव वाढले असले तरी त्यांनी वेफर्स विक्री सुरू ठेवली आहे. जामदा रस्त्यावर थाटलेल्या केळी वेफर्सच्या दुकानात कारागीर न लावता, स्वतः कविता या केळी तळतात. सध्या रणरणते ऊन असतानाही केवळ झाडाच्या सावलीत भट्टीजवळ बसून त्या वेफर्स तयार करतात. 

सध्या दिवसाला वीस किलो वेफर्स विकले जात असल्याचे अनंत महाजन यांनी सांगितले. एक किलो केळीचे २०० ग्रॅम वेफर्स तयार होतात. १६० रुपये किलो दराने या वेफर्सची विक्री केली जाते. वेफर्स तयार करण्यासाठी हलक्‍या दर्जाची केळी वापरली जाते. बाजारात केळीला चांगला भाव असल्याने केळी मिळवण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे आठ दिवस पुरेल एवढी केळी सध्या घरात भरून ठेवली असल्याचेही त्यांनी सांगितले. वाळूचा व्यवयास करताना मिळणाऱ्या पैशांपैकी या व्यवसायातून कमी पैसे मिळत असले तरी ते कष्टाचे व प्रामाणिक मार्गाने मिळवलेले असल्याने मनस्वी खूप समाधान वाटत असल्याचे महाजन दांपत्यांनी सांगितले. 

पतीला अवैध धंदे करण्यापासून परावृत्त करण्यात मला यश आले. दोन महिन्यात आम्ही चांगला पैसा कमवला. या व्यवसायात कष्ट असले तरी यात आमचा संसार, मुलांचे शिक्षण सर्व काही ठीक आहे. आम्ही पती, पत्नी मनाने तरी खूपच समाधानी आहोत. 
- कविता महाजन, गृहिणी - मेहुणबारे

Web Title: Success in preventing illegal business from her husband