Success Story:10 वर्षे सातत्य ठेवत पिकवला पुदिना;आज कमावत आहेत लाखों रुपये

Success Story:10 वर्षे सातत्य ठेवत पिकवला पुदिना;आज कमावत आहेत लाखों रुपये

पुणे शहरापासून काही किलोमीटर असलेल्या वडकी- गायकवाडी येथील नितीन व सचिन गायकवाड बंधूंनी पुदिना शेतीत नाव कमावले आहे. दहा वर्षांपासून सातत्य ठेवत आठ ते दहा एकरांत वर्षभर पुदिना पिकवून त्याची विक्री व्यवस्था तयार करण्यात व त्यातून अर्थकारण उंचावण्यात या बंधूंनी यश मिळवले आहे.

पुणे शहरापासून दहा- बारा किलोमीटरवर असलेल्या वडकी ग्रामपंचायत अंतर्गत गायकवाडवाडी उत्कृष्ट शेतीसाठी ओळखली जाते. लोकसंख्या साधारणपणे हजार ते पंधराशेच्या आसपास आहे. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. तरीही पाण्याच्या नियोजनातून गावात बारामही फळबाग व भाजीपाला पिके डोलू लागली आहेत. सीताफळ, चिकू, पेरू यांसह पुदीना, मेथी, पालक, चाकवत, कढीपत्ता, गवती चहा अशी विविधता दिसत आहे. गावातील अनेक उमदे तरुण शेती क्षेत्राकडे वळत आहेत ही समाधानाची बाब आहे. कृषी विभाग व ‘आत्मा’ यांच्या माध्यमातून जलसंधारणासह सेंद्रिय शेती, गटाने विक्री करण्याच्या योजना गावात राबविण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत. 

पुदिन्याची शेती 
गावातील काही शेतकऱ्यांनी पुदीना लागवडीवर भर दिला आहे. पुणे शहर जवळ असल्याने त्याला मागणीही चांगली आहे. हीच संधी साधल्याने गावात सुमारे ५० ते ६० एकरांवर पुदिना दिसून येतो. यातील नितीन व सचिन या गायकवाड बंधूंचा वाटा अधिक आहे. त्यांची वडिलोपार्जित १५ एकर शेती आहे. दहा वर्षांपूर्वी त्यांनी पुदिन्याची शेती सुरू केली. एक एकरांपर्यंतच क्षेत्र होते. मात्र बाजारातील मागणी, दर व अर्थशास्त्र अभ्यासून त्यांनी क्षेत्र वाढवत नेले. गेल्या पाच वर्षांत आठ ते दहा एकरांवर त्यांची पुदीना लागवड दिसून येते. 

काढणी व विक्री व्यवस्था 
प्रत्येक सव्वा ते दीड महिन्याने काढणी येत असल्याने मजुरांची कायम गरज लागते. शिवाय अलिकडील काळात क्षेत्रही १० एकरांपर्यंत पोचले असल्याने ८ मजूर कायम तैनात असतात. वर्षभर सुमारे २० ते २५ मजूर कायम कामाला असतात. त्यातून त्यांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. एकूण शेतीतील मजुरांवरील रोजचा खर्च दहा हजार रुपयांपर्यंत असल्याचे सचीन सांगतात. 

वाहतुकीसाठी क्रेटचा वापर 
अलीकडील काळात शेतीमालाचे पॅकिंग महत्त्वाचे झाले आहे. पूर्वी पोत्यांमधून माल वाहून नेला जायचा. आता वाहतुकीत होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच ग्राहकांना दर्जेदार व ताज्या प्रतीचा पुदिना मिळावा यासाठी प्लॅस्टिक क्रेटचा वापर गायकवाड करतात. प्रति क्रेटमध्ये वळपास ७५ गड्डी पुदिना भरून विक्रीसाठी पाठविला जातो. त्यासाठी मालवाहू वाहन खरेदी केले आहे. त्यात १०० क्रेट माल भरण्यात येतो. प्रत सांभाळल्याने ग्राहक आकर्षित होऊन चांगला दर मिळण्यास मदत झाली आहे. 

उत्पन्न 
विक्री पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये केली जाते. त्यासाठी काढणीचे योग्य नियोजन केले असून, दररोज जवळपास सातहजार ते आठ हजार गड्डी काढल्या जातात. एक एकरात सुमारे ३० ते ३५ हजार गड्डी निघतात. पुदीन्याला दरवर्षी जून ते डिसेंबर या काळात चांगला दर म्हणजे प्रति गड्डी ४ ते ५ रुपये दर असतो. तर डिसेंबर ते मे या कालावधीत तो घसरून एक ते दोन रुपयांवर येतो. वर्षभराची सरासरी लक्षात घेतली तर गड्डीला दोन रूपये दर राहतात. प्रत्येक दीड महिन्याला दहा एकर क्षेत्र असेल तर तेवढ्या कालावधीत दररोज सातहजार गड्ड्या व एक ते दोन रुपये दर (प्रति गड्डी) या हिशेबाने सात हजार ते १४ हजार रुपये उत्पन्न हाती येते. काही वेळा दर एक रुपयापेक्षाही खाली घसरतो. हाती काहीच नफा शिल्लक राहत नाही अशीही स्थिती असते. मात्र वर्षभर अधिक क्षेत्रावर हे पीक वेगवेगळ्या अवस्थेत घेत राहिल्याने झालेले नुकसान पुढे भरून काढण्याची संधी मिळते. 

पीक व्यवस्थापन- ठळक बाबी 
नितीन शेती तर विक्रीची जबाबदारी सचिन सांभाळतात. 
एकरी सात ते आठ ट्रेलर शेणखत वापरून चार फुटांचे बेड घेतले जातात. ठिबक यंत्रणा व स्प्रिंकलरचा वापर करून काड्यांद्वारे लागवड केली जाते. दोन काड्यांमध्ये सुमारे दोन इंच अंतर असते. 
एकदा लागवड केल्यानंतर पुढे दोन ते तीन वर्षे चांगले उत्पादन मिळते राहते. त्यानंतर उत्पादनात घट सुरू होते. 
प्रत्येक सव्वा ते ते दीड महिन्यात पुदीना काढणीस येतो. 
सुरुवातीच्या काळात आठवड्यातून एकदा कीडनाशकांचा वापर केला जातो. मात्र रसायनांच्या वापरापेक्षाही देशी गोमूत्र व शेण स्लरीचा वापर अधिक प्रमाणात होतो. 
पुदिना पिकला पाणी चांगल्या प्रमाणात लागते. मात्र पावसाचे प्रमाण कमी असल्याने दोन एकरांत शेततळे उभारले आहे. पावसाळ्यात पाणी साठवून गरजेनुसार त्यातील पाण्याचा वापर ठिबक व तुषार सिंचनाद्वारे केला जातो. हिवाळ्यात दोन दिवसांनी मात्र उन्हाळ्यात एकरी एक ते दोन तास पाणी दिले जाते. गवती चहाला देखील तुषार सिंचनाचा वापर होतो.

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

गवती चहाची लागवड 
दीड एकरात लागवड. दररोज ३०० गड्ड्यांची काढणी. विक्री पुणे मार्केटला. 
गड्डीला १५ ते २० रुपये दर मिळतो.

गोपालन 
सुमारे १२ ते १५ गीर गायींचे पालन. 
दररोज ५० लिटरपर्यंत दूध मिळते. ८० रुपये प्रति लिटर दराने हडपसर- मगरपट्टा येथील ग्राहकांना विक्री. त्यातून उत्पन्नाला चांगला हातभार. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com