
अलीकडच्या काळात सर्वच क्षेत्रात मुलांपेक्षा मुलींच्या यशामध्ये वाढ होताना दिसत आहे.
जिद्द असावी तर अशी! वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलीनं 22 व्या वर्षीच CA केलं पार
गोडोली (सातारा) : अलीकडच्या काळात सर्वच क्षेत्रात मुलांपेक्षा मुलींच्या यशामध्ये वाढ होताना दिसत असून, सीएसारख्या (CA Exam) काठिण्य पातळी अधिक असणाऱ्या या अभ्यासक्रमात वृत्तपत्र विक्रेते राजेंद्र आनंदराव माळी यांच्या माधुरीने अवघ्या २२ व्या वर्षी सीए परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. जिद्दीच्या जोरावर यश मिळवताना परिस्थिती आड येत नाही, हाच जणू काही माधुरीने (Madhuri Mali) सर्वच तरुण-तरुणींच्या पुढे आदर्श उभा केला आहे. पुढील काळातही वकिलीचे शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द माधुरीत आहे. राष्ट्रीय स्तरावरील सीए परीक्षेचा निकाल ११.९७ टक्के एवढाच असूनही त्यात माधुरीचे यश उठून दिसत आहे.
माधुरी माळीचे वडील साताऱ्याशेजारील खेड, चाहूर व परिसरात वृत्तपत्र विक्रीचे काम करतात. आई कल्पना माळी यांचे माहेर भुईंजच्या शेवतेंचे. त्यांनी बचतगट स्थापन करून स्त्रियांमध्ये आर्थिक जागृती करण्याचे काम सुरू ठेवले आहे. माधुरीने तिच्या आवडीचे क्षेत्र निवडावे व त्यात स्वतःच्या पायावर उभे राहावे, अशी राजेंद्र व कल्पनाताईंची इच्छा. त्यामुळे पडेल ते कष्ट घेऊन उभयतांनी आर्थिक ओढाताण सहन करून मुलीला उच्च शिक्षित करायचे ठरविले होते. त्यांच्या अपेक्षांना यश मिळाले. माधुरीचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब कल्याणी विद्यामंदिर व उच्च शिक्षण ‘रयत’च्याच धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयात साताऱ्याला पूर्ण झाले. सीएची परीक्षा अवघड असली, तरी माधुरीने महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राचार्यांच्या बरोबरच जीवन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्याच प्रयत्नात कठीण परीक्षेत यश मिळवले.
हेही वाचा: राष्ट्रपतीपदाचा उमेदवार अभिजीत बिचुकले सध्या काय करतोय?
वडिलांच्या इच्छेसाठी सीए
शालान्त परीक्षेत ९४.४० टक्के गुण, बारावीला ८८ टक्के गुण व पदवीला ७५ टक्के गुण मिळवणाऱ्या माधुरीने वडिलांच्या इच्छेसाठी सीए होण्याचे ठरविले व त्यात जिद्दीने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. पुढील काळात कायद्याचे शिक्षण घेऊन याही क्षेत्रात काम करून ठसा उमटवण्याची जिद्द माधुरीत पाहायला मिळते. माळी कुटुंबीयांना माधुरीच्या धडपडीबद्दल अभिमान वाटतो.
Web Title: Success Story Madhuri Mali Success In National Level Ca Exam
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..