निवृत्तीनंतर ते बनलेत पाणीपुरवठ्याचे ‘वैद्य’!

हरी तुगावकर
शुक्रवार, 11 मे 2018

लातूर - एखादे आवडीचे काम करायला मिळाले तर व्यक्ती वय विसरून ते करण्याची तयारी दर्शविते. त्याच्यासाठी हा आनंदाचा, जगण्याला बळ देण्याचा क्षण ठरू शकतो. अशीच काहीशी अनुभूती येथील निवृत्त अभियंता घेत आहे.

महापालिकेचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत निवृत्त झालेला हा अभियंता पुढे आला. वयाच्या ७२ व्या वर्षी अवघ्या एक रुपया मासिक मानधनावर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे तांत्रिक सल्लागार म्हणून काम सुरू केले आहे. 

लातूर महापालिका आर्थिक अडचणीत असल्याने आयुक्त दिवेगावकर यांनी शहराच्या विकासासाठी निवृत्तांनी पुढे यावे, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातून निवृत्त झालेले उपअभियंता सूर्यकांत वैद्य सरसावले. १९६७ मध्ये शासकीय सेवेत रुजू झालेले वैद्य २००४ मध्ये निवृत्त झाले. त्यांनी लातूर, अंबाजोगाई, निलंगा, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आदी ठिकाणी काम केलेले आहे. 

लातूरच्या पाणीपुरवठा योजनेवर त्यांनी पंधरा वर्षे काम केल्याने त्यांना सर्व माहिती आहे. शहरात पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे त्यांना पाहवत नव्हते. त्यात आपल्या आवडीचे काम मिळत असल्याने वैद्य यांनी आयुक्त दिवेगावकर यांच्याशी संपर्क साधला. अवघ्या एक रुपया मानधनावर काम करण्याची तयारी दर्शविली. आयुक्त दिवेगावकर यांनीही तातडीने त्यांना पाणीपुरवठा विभागाचे तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्तिपत्रही दिले. 

वयाचा विचार न करता वैद्य यांनी तरुणांप्रमाणे कामालाही सुरवात केली आहे. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रांतील निवृत्त पुढे आले तर त्यांचे ज्ञान व अनुभवाचा फायदा शहर विकासासाठी होऊ शकतो.

वैद्य यांच्याकडील कामे
  अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेचे कार्यान्वयन सुरळीत करणे
  साई, नागझरी, धनेगाव, जलसाठ्यातून पाणी उपसा, वितरण
  पाणी वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून समप्रमाणात वितरण
  शुद्धीकरण, पाण्याच्या गुणवत्ता चाचणीबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
  पाणी गळती, वितरण वेळापत्रकाबाबत मार्गदर्शन करणे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suryakant vaidya water supplier motivation