शिक्षकाने बनवला स्वस्तातील "ई-लर्निंग संच' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

पुणे - घरातील जुना टीव्ही...पडून असलेल्या वायर्स...अत्यंत कमीत कमी उपलब्ध होणारी इतर आवश्‍यक उपकरणे आदींच्या साह्याने कोंढवा बुद्रुक येथील महापालिकेच्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक दीपक गायकवाड यांनी अल्पकिमतीत "ई-लर्निंग संच' कार्यान्वित केला आहे. आर्थिक क्षमता नसलेल्या शाळांना कमी खर्चात या प्रकारचा संच बनविणे त्यामुळे उपयुक्त ठरणार आहे. 

पुणे - घरातील जुना टीव्ही...पडून असलेल्या वायर्स...अत्यंत कमीत कमी उपलब्ध होणारी इतर आवश्‍यक उपकरणे आदींच्या साह्याने कोंढवा बुद्रुक येथील महापालिकेच्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक दीपक गायकवाड यांनी अल्पकिमतीत "ई-लर्निंग संच' कार्यान्वित केला आहे. आर्थिक क्षमता नसलेल्या शाळांना कमी खर्चात या प्रकारचा संच बनविणे त्यामुळे उपयुक्त ठरणार आहे. 

शाळांमध्ये सध्याच्या परिस्थितीत ई-लर्निंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी साधारणपणे दहा ते वीस हजार रुपयांची गुंतवणूक आवश्‍यक असते. परिणामी आर्थिक क्षमता कमी असलेल्या शाळांना ती कार्यान्वित करणे शक्‍य होत नाही. अशा शाळांसाठी गायकवाड यांनी स्वत: बनविलेली अल्पदरातील "ई-लर्निंग संच' पथदर्शी ठरणार आहे. कोंढवा बुद्रुक येथील महापालिका शाळा क्रमांक 95 जी या शाळेत गायकवाड हे तंत्रस्नेही शिक्षक आहेत. त्यांनी आपल्या घरातील जुना टीव्ही शाळेत नेला. टीव्हीला मोबाईल जोडण्याकरिता त्यांनी "स्क्रीन कास्ट' आणि "कन्व्हर्टर' अशी साधारणपणे दोन ते अडीच हजार रुपयांची उपकरणे घेतली. टीव्हीला ही उपकरणे जोडण्यासाठी घरात पडून असलेल्या वायर्सचा वापर केला. याबाबत गायकवाड म्हणाले, ""अशा पद्धतीने शाळेत "ई-लर्निंग'ची प्रणाली कार्यान्वित करणे शक्‍य झाले आहे. मोबाईलमध्ये संबंधित अभ्यासक्रमाचे व्हिडिओ, माहितीपट, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन डाउनलोड करून ठेवायचे. शाळेत वर्ग सुरू झाल्यावर मोबाईल टीव्हीला जोडायचा आणि संबंधित विषयाचा अभ्यासक्रम ऑफलाइन पद्धतीने मुलांना शिकवायचा, या प्रकारे ही प्रणाली वापरली जाते.'' 

या प्रणालीचे सादरीकरण राज्याच्या शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले. "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' उपक्रमांतर्गत राज्य स्तरावर तंत्रस्नेही शिक्षकांचे विविध गट कार्यरत आहेत. शिक्षण अधिक सुलभ करण्यासाठी आपल्याला अवगत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे कसे शक्‍य होईल, याबाबत या गटात चर्चा केली जाते, यात आपलाही समावेश आहे, असे गायकवाड यांनी सांगितले. 

गायकवाड यांनी स्वत:ची संकल्पना वापरून ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी "एक तुकडी, एक तास' या पद्धतीने ही प्रणाली वापरून शिकविण्यात यावे, यासाठीचे नियोजन सुरू आहे. शाळेत सुमारे साडेपाचशे विद्यार्थी असून, प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना या प्रणालीचा लाभ मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 

- शिवाजी ढावारे, मुख्याध्यापक, महापालिका शाळा क्रमांक 95 जी, कोंढवा बुद्रुक

Web Title: teacher made e-learning set