पुण्यातील युवकाने केले डिझाईन; व्हेंटिलेटर बनविण्याची "कॅप्टन'ची इच्छा पूर्ण 

सम्राट कदम - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

पुण्यातील भैरव शहा याने कॅप्टन भरुचा यांच्या कल्पनेवर आधारित व्हेंटिलेटरची त्रिमितीय (थ्रीडी) रचना पूर्ण केली आहे.

पुणे - देशातील सामान्यांना किफायतशीर किमतीत व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्नशील असलेल्या नव्वदीतील कॅप्टन रुस्तुम भरुचा यांचे स्वप्न पुण्यातील एका तरुणाने पूर्ण केले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात देशात वैद्यकीय उपकरणांची मोठ्या प्रमाणावर आवश्‍यकता आहे. हीच गरज लक्षात घेत पुण्यातील भैरव शहा याने कॅप्टन भरुचा यांच्या कल्पनेवर आधारित व्हेंटिलेटरची त्रिमितीय (थ्रीडी) रचना पूर्ण केली आहे. व्हेंटिलेटरची प्रत्यक्ष निर्मिती आणि चाचणीसाठी आता हे डिझाईन मोफत उपलब्ध आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कॅप्टन रुस्तुम भरुचा यांनी काही वर्षांपूर्वी स्वस्तातील आणि स्वामित्व हक्क नसलेले व्हेंटिलेटर निर्माण व्हावे, यासाठी पुढाकार घेतला होता. भरूचा यांच्या कल्पनेवर आधारित तयार केलेल्या "एमसीसीआयए- एमइसीएफ' नावाच्या व्हॉट्‌सऍप गटाचे शहा हे सदस्य होते. शहा म्हणाले, ""व्हेंटिलेटरच्या निर्मितीसाठी आवश्‍यक कल्पना मला त्या ग्रुपच्या माध्यमातून मिळाली. त्या संकल्पना आणि रचनांवर संशोधन करुण मी एक परिपूर्ण डिझाईन विकसित केले आहे. आता केवळ त्याची निर्मिती आणि चाचण्या होणे गरजेचे आहे.'' रचनेवर काम करण्यासाठी चंद्रुदत्ता पारखे यांचे सहकार्य लाभले असून, हे डिझाईन मोफत उपलब्ध असल्याचे शहा यांनी सांगितले. 

coronavirus:   किराणा हवा आहे... फक्त क्‍लिक करा!

व्हेंटिलेटरचे वैशिष्ट्ये ः 
- प्राथमिक उपचारासाठी वापर शक्‍य 
- वेळेच्या चक्रावर आधारित दाब नियंत्रण 
- विद्युत ऊर्जा नसतानाही कार्यरत 
- ग्रामीण आणि दुर्गम भागांसाठी उपयुक्त 
- सहज उपलब्ध साधनांच्या आधारे मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्‍य 
- बॅग वॉल्व मास्कची (एमबीयु बॅग) आवश्‍यकता नाही 
- "बॅरोट्रॉम' शक्‍यता अत्यल्प 

""नव्वदच्या दशकात कॅप्टन भरुचा यांच्या कार्यशाळेत हे व्हेंटिलेटर तयार होत होते. किफायतशीर व्हेंटिलेटर निर्मिती आणि विकास होणे गरजेचे आहे. कोरोना संसर्गाच्या काळात ते अत्यंत उपयुक्त आहे.'' 
- भैरव शहा, डिझाईन निर्माता 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three-dimensional design of the ventilator is completed